पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभूमिका पार पाडावी असे वाटते हे बड्या राष्ट्रांच्या नेत्यांनी ओळखलेले आहे. भारत बडे राष्ट्र होणार याचा अर्थ आजच्या बड्या राष्ट्रांच्या सत्तेच्या प्रभावाचे क्षेत्र मर्यादित होणार असा होतो. आजची बडी राष्ट्रे हे कशाकरिता सहन करतील? भारताला हळूहळू सामर्थ्यवान करण्याची नेहरूंची धडपड आणि भारताने सामर्थ्यवान होऊ नये म्हणून बड्यांनी चालविलेली धडपड या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बड्या राष्ट्रांचे पाकिस्तान-प्रेम समजावून घेतले पाहिजे. भारताच्या छातीवर पाकिस्तान हे रोखून ठेवलेले पिस्तूल राहणे आवश्यक आहे असे भारताचे माजी ब्रिटिश सरसेनापती सर आचिन्लेक यांनी लिहून ठेवल्याचे आता ज्ञात झाले. आहे. अमेरिका तर आधीपासूनच भारताबद्दल संशयी भूमिका बाळगून होती. भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले यामुळे नाराज होऊन अमेरिकेने पाकिस्तानला लष्करीदृष्ट्या बलवान करावयाचे ठरविले ही नेहरूंच्या विरोधकांनी रचलेली भाकडकथा आहे. भारत बलवान होऊ नये ह्या अमेरिकेच्या मूलभूत धोरणातूनच अमेरिका-पाकिस्तान जवळीक निर्माण झाली होती व आहे. एरवी १९४३ साली दक्षिण आफ्रिकेने भारतीयांच्या मूलभूत हक्कांच्या प्रश्नांवर अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रसंघातील तेव्हाचे उपमंत्री श्री. जॉन फॉस्टर डल्लेस सांनी भारतविरोधी मतदान करताना भारत रशियन कम्युनिझमच्या प्रभावक्षेत्राखाली गेला आहे' असे उद्गार काढण्याचे काही प्रयोजन नव्हते. रशियाने या प्रश्नावर भारताच्या बाजूने मतदान केले हे डल्लेस यांना निमित्त मिळाले होते. पुढे पाकिस्तानने चीनशी चुंबाचुंबी सुरू केल्यानंतर पाकिस्तान चिनी कम्युनिझमच्या प्रभावाखाली गेला आहे असे म्हणून अमेरिकेने पाकिस्तानविरोधी धोरण स्वीकारल्याचे आपल्याला दिसत नाही. चीन तर भारताकडे आशियातील आपला प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहत होता आणि सोव्हिएत रशियाचे सुरुवातीचे धोरण सावधतेचे आणि तुच्छतेचेच होते. 'साम्राज्यवाद्यांच्या पायाशी लोळण घातलेला कुत्रा' या शब्दातच मॉस्को नभोवाणी सुरुवातीच्या काळात नेहरूंची संभावना करीत होती. लष्करी करारांनी रशियाला वेढण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा पाकिस्तान हा जेव्हा दुवा बनला तेव्हाच रशियाने भारतानुकूल धोरण अवलंबिले आहे. काश्मीर प्रश्नावर भारताला रशियाचा मिळालेला पाठिंबा शीतयुद्ध ऐन भरात असतानाच होता. शीतयुद्धाचा भर ओसरताच रशियाचा काश्मीरवरील पाठिंबा संदिग्ध बनला आणि अमेरिकेप्रमाणे पाकिस्तानला उपखंडात भारताच्या बरोबरीने लेखण्याचे रशियन धोरण उदयाला आले. ताश्कंद करार हा ह्या धोरणाची फलश्रुती आहे. पुढे रशिया आणि चीन यांच्या ताणलेल्या संबंधांच्या संदर्भात व अमेरिका आणि चीन यांच्या जवळिकेच्या आणि पाकिस्तान हा त्या जवळिकेतील दुवा बनल्याच्या संदर्भात रशियाने पुन्हा आपला मोहरा बदलला आहे. परंतु दरम्यान भारत-रशियन मैत्रीकरारही होऊन चुकला आहे हेही विसरता कामा नये.

 येथे पाकिस्तान आणि या तीन बड्या राष्ट्रांच्या भारतविषयक उद्दिष्टांतील साम्यस्थळे शोधून काढणे आवश्यक आहे. भारत दुबळा राहावा येथपर्यंत या चारही राष्ट्रांचे एकमत होते अथवा आहे. परंतु तो केवळ दुबळा राहण्याने पाकिस्तानचे समाधान होणारे नव्हते. पाकिस्तानच्या मनोवृत्तीशी पोलंडसारख्या छोट्या राष्ट्राला शेजारच्या सोव्हिएत रशियासारख्या बड्या राष्ट्राविषयी वाटणाऱ्या भीतियुक्त मनोवृत्तीचे काही साम्य नाही. पाकिस्तानच्या आक्रमक

१२०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान