पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/120

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेमिझो यांच्या बंडखोरीला उत्तेजन देणे बंद झाल्यामुळे भारताची पूर्व सीमा अधिक सुरक्षित बनली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रश्नावर दडपण आणणे आता पाकिस्तानला कठीण होणार आहे आणि युद्ध करून काश्मीर जिंकण्याची भाषा आता तो दीर्घकाळ करू शकणार नाही. मध्य आशियाई राष्ट्रगटात गेल्याने पाकिस्तानला फार तर त्याच्या अस्तित्वाची हमी मिळेल. भारताविरुद्ध त्याचा फारसा उपयोग होणार नाही आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात तो प्रभावही पाडू शकणार नाही. जिव्हारी झोंबणाऱ्या पराभवाचे शल्य दीर्घकाळ पाकिस्तानची जनता आणि राज्यकर्ते बाळगत राहतील आणि भारताच्या वाढत्या सामर्थ्याविरुद्ध आपण काही करू शकत नाही हेही त्यांना जाणवत राहील आणि तरीही हे सामर्थ्य भारताच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे आहे उजव्या हिंदू राष्ट्रवाद्यांचे नाही, हे ते दीर्घ काळ मान्य करणार नाहीत. असंख्य भाषिक, धार्मिक आणि वांशिक गटांना एकत्र बांधण्याची किमया करणाऱ्या या राष्ट्रवादाने भारतात धर्म हा हळूहळू राजकारणात तरी विसरला जाण्याकडे काही पावले निश्चित टाकली गेली आहेत हे मनापासून मान्य केल्यानेच पाकिस्तान सहजीवनाच्या रस्त्याकडे वळू शकेल. भारताच्या दृष्टीने तरी ही वाटचाल करीत राहणे हेच उत्तर ठरते.
 हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कदाचित वाटाघाटी झालेल्या असतील. आज तरी पाकिस्तानचे एक लाख कैदी भारताच्या ताब्यात आहेत. पश्चिम सीमेवर सिंध आणि पंजाबमध्ये भारताने काही प्रदेश जिंकलेला आहे. काश्मीरचा प्रश्न कायमचा निकाल करण्याच्या हेतूने वाटाघाटी करण्यात येतील. भारताच्या दृष्टीने शस्त्रसंधी रेषा काही फेरफार करून कायमची सीमा बनवणे हानिकारक ठरणार नाही. अशा परिस्थितीत काश्मीरची जनता आणि आपण असे फार तर प्रश्नाचे स्वरूप राहील. पाकिस्तान अशा तडजोडीला तयार होईल असे वाटत नाही. आणि शक्यता ही आहे की रशिया पुन्हा भारतावर दडपण आणून जिंकलेला प्रदेश सोडायला लावील.
 पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणाची ही मीमांसा करीत असताना बड्या राष्ट्रांच्य पाकिस्तानच्या संदर्भातील भारतविषयक धोरणाची येथे चर्चा करणे उपयुक्त ठरेल. कधीकधी व्यक्तींना, आंदोलनांना आणि समुदायांना आपल्या मानसिक समाधानासाठी 'शत्-प्रतीक' लागत असते. हिंदू हे जीनांचे शत्रू-प्रतीक होते. पुढे भारत हे त्यांचे व पाकिस्तानचे शत्रू-प्रतीक बनले. भारताला राष्ट्रवादाची जडणघडण करण्यासाठी शत्रू-प्रतीकाची जरूरी भासलेली नाही. पाकिस्तानच्या या शत्रू-प्रतीक मनोवृत्तीचा बड्या राष्ट्रांनी उपयोग करून घेणे स्वाभाविक होते.

 सर्वच बडी राष्ट्रे पाकिस्तानला मदत करतात, भारत-पाक वादात पाकिस्तानला पाठिंबा देतात याचे आपणाला आश्चर्य वाटायचे. वस्तुत: यात आश्चर्य वाटायचे काही कारण नव्हते. जगात यापुढे चार प्रबळ राष्ट्रे होतील आणि त्यातील भारत हे एक असेल असे नेहरूंनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' मध्ये लिहून ठेवले आहे, ते बड्या राष्ट्रांच्या भारतविरोधी धोरणाबद्दल आश्चर्य वाटणाऱ्या लोकांनी कधी वाचलेले दिसत नाही. जगाचा सत्तासमतोल यापुढे या चार राष्ट्रांत (अमेरिका, रशिया व चीन ही इतर तीन बडी राष्ट्रे आहेत) विभागला जाईल, असे नेहरू म्हणतात. तेव्हा नेहरूंना भारताने मोठे राष्ट्र व्हावे आणि बड्या राष्ट्राची

पाकिस्तानची उद्दिष्टे /११९