पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/115

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेप्रदेशातून भारताचे सैन्य मागे हटले आणि एकमेकांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याच्या आणि दोन्ही देशांतील संबंध पूर्ववत् करण्याच्या भारताच्या वारंवार केलेल्या सूचनांना पाकिस्तानने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. परकीय जहाज कंपन्यांच्या जहाजांतून कराचीला सुमारे शंभर कोटींचा भारताचा आयात केलेला माल पाकिस्तानने युद्धकाळात उतरवून घेतला होता. भारतीय नागरिकांचे काही उद्योग ताब्यात घेतले होते. पूर्वी बंगालमार्गे आसामशी जलवाहतूक करणाऱ्या भारतीय जहाजकंपनीच्या असंख्य बोटी अडकवून ठेवल्या होत्या. याच्या मोबदल्यात भारताकडे पाकिस्तानच्या जप्त केलेल्या मालाची किंमत जेमतेम पाच कोटी भरत होती. अशा रीतीने ताश्कंद करारानुसार भारताने बरेच काही गमावले. १९६५ मधील २२ दिवसांच्या युद्धाला सुमारे १०० कोटी रुपये दोन्ही देशांना खर्च आला असे गृहीत धरले तर पाकिस्तानने भारताचा माल जप्त करून आपला युद्धाचा खर्च भरून काढला आणि भारतीय नेत्यांच्या वेंधळ्या मुत्सद्देगिरीने युद्धाच्या खर्चाबरोबर देशाचे १०० कोटी रुपयेही घालविले असा याचा अर्थ होतो.
 तथापि भारताच्या दृष्टीने युद्धाचे इतर काही दूरगामी फायदे निश्चित झाले. गंभीर आक्रमण भारत सहन करणार नाही हे पाकच्या राज्यकर्त्यांना कळून चुकले. नेहमी वादग्रस्त भागातच युद्धक्षेत्र मर्यादित ठेवून भारताला अडचणीत आणणारे तंत्र उपयोगी पडणार नाही. युद्ध नेहमी सर्वंकष राहील व पाकिस्तानवर कुठेही हल्ला केला जाईल हेही पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी ओळखले. पाकचे बरेचसे युद्धयंत्रही खिळखिळे झाले आणि सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे काश्मीर प्रश्न कायमचाच संयुक्त राष्ट्रसंघाच्या कचेरीतून बाद झाला. त्याचबरोबर भारताचे ऐक्य आणि राष्ट्रीय संघटन नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाभोवती गुंफलेले नाही, किंबहुना भारताच्या मूलभूत ऐक्याचे नेहरू हे एक प्रतीक होते हे पाकिस्तानला जाणवले. भारत हा कृत्रिमरीत्या एकत्र आणलेला देश नाही, पेचप्रसंगात त्या देशाचे ऐक्य तावूनसुलाखून निघाले आहे हा पाकिस्तानला या युद्धाने शिकवलेला धडा होता.
 या युद्धाच्या धक्क्यातून पाकिस्तान पुढे कधी सावरलेच नाही. शस्त्रबळाने भारतावर मात करू शकत नसल्याच्या जाणिवेने आलेले नैराश्य, सैन्यदलाच्या प्रतिष्ठेला बसलेला धक्का, औद्योगिक व आर्थिक प्रगतीत आलेला खंड आणि वाढता असंतोष यामुळे आयूबखानांचे आसन डळमळीत झाले. पुढे त्यांना जो सत्तात्याग करावा लागला त्याची बीजे १९६५ च्या युद्धाच्या अपयशात आहेत. किंबहना पाकिस्तानच्या विघटनाची आणि पर्यायाने बांगला देशाच्या उदयाची बीजेदेखील १९६५ च्या युद्धाच्या अपयशात शोधावी लागतील.

 या युद्धाने पाकिस्तानच्या तथाकथित राष्ट्रीय ऐक्याचे भ्रम दूर झाले. पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम या दोन विभागांतील ऐक्य भारतविरोधाच्या धाग्यावर गुंफण्यात आले होते. हे ऐक्य इस्लामच्या सैद्धांतिक एकतेचा पुरस्कार करून अंतर्गत बाबतीत साधण्याचे प्रयत्न एकीकडे करत असतानाच या दोन्ही प्रदेशांना भौगोलिकदृष्ट्या जवळ आणल्याखेरीज त्यांना एकत्र ठेवता येणार नाही याची जाणीव पाकिस्तानी राज्यकर्त्यांना निश्चित होती. जीनांनी याचकरिता 'कॉरिडॉर' ची मागणी केली होती. ती न मिळाल्याने दोन्ही दिशांकडून प्रदेश विस्तार करूनच हे ऐक्य टिकवता येणे शक्य आहे हेही पाकराज्यकर्ते जाणीत होते. परंतु

११४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान