पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेकचखाऊ नेतृत्व यांचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. ब्रिटिशांच्या मध्यस्थीने शास्त्रींनी कच्छवर आंतरराष्ट्रीय लवाद मान्य केला. या लवादाच्या निर्णयानुसार पुढे कच्छचा काही भाग भारताला पाकिस्तानला द्यावा लागला. परंतु तेव्हा तरी भारताची राजनैतिक आणि लष्करी पातळीवर मानहानी करण्यात पाकिस्तान यशस्वी झाले.
 १९६५ चे युद्ध या पार्श्वभूमीतून झाले आहे. कच्छवर हल्ला झाल्यावर पोकळ इशारे न देता आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जाण्याचे व सार्वत्रिक युद्ध करण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले असते तर सप्टेंबर १९६५ मध्ये युद्ध झाले नसते. कारण पाकिस्तान मग काश्मीरात घुसखोर पाठविण्यास धजावले नसते. किंवा सप्टेंबर १९६५ चे युद्ध मे १९६५ लाच झाले असते असे फार तर म्हणता येईल. परंतु भारतीय नेतृत्व भारतीय प्रदेशावर "आक्रमण केले असतानाही युद्ध करावयाचे टाळते आहे असे जेव्हा दिसले तेव्हा पाकिस्तानची उमेद बळावली. काश्मीरमध्ये घुसखोर पाठवून तेथे अराजक माजवायचे व मग सरळ सैन्य घुसवून भारतीय सैन्याला तेथे कोंडीत पकडायचे हा आयूबखान यांचा मनसुबा होता. भारत सरकार काश्मीरखेरीज इतरत्र आघाडी उघडणार नाही अशी कच्छच्या अनुभवावरून त्यांनी अटकळ बांधली होती. तथापि काश्मीर हातचा जात असता पाहणे भारतातील दुबळ्या नेतृत्वालाही शक्य नव्हते. १९६२ च्या मानहानीनंतर सैन्यदलाने अधिक मानहानी पत्करली नसती आणि सरकार कदाचित टिकलेही नसते. सरकारला अखेर लाहोरवर धडक मारावी लागली आणि काश्मीरमधील मर्यादित लढाईला व्यापक युद्धाचे स्वरूप आले.
 या युद्धाची सविस्तर माहिती देण्याचे प्रयोजन नाही. काश्मीर या युद्धात भारताने जाऊ दिला नाही हे खरे भारताचे यश होते. पंजाबमध्ये भारतीय सैन्य पाकिस्तानी प्रदेशात घुसून राहिले. ताश्कंद करार झाला नसता तर भारताचे काही बिघडले नसते. भारताच्या राजस्थानमधील काही चौक्या तेवढ्या पाकिस्तानने व्यापल्या होत्या. त्याच्या मोबदल्यात पाकिस्तानचा अधिक प्रदेश भारताच्या ताब्यात आला होता. परंतु रशियाने मध्यस्थी करून दोन्ही देशांना सैन्य मागे घ्यावयास भाग पाडले.

 ताश्कंद कराराने भारताने एवढेच गमावले नाही. आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील प्रदेश कधी ना कधी सोडावा लागलाच असता. परंतु पाकव्याप्त काश्मीरमधील जिंकलेली मोक्याची ठाणीही भारताला गमवावी लागली. ताश्कंद कराराने भारत-पाक संबंधाला चांगले वळण लागले असते तर याबद्दलची तक्रार केली गेली नसती. एक तर थोडी देवघेव करून शस्त्रसंधीरेषेचे आंतरराष्ट्रीय सीमेत रूपांतर करण्याचा आग्रह भारतीय नेत्यांनी धरावयास हवा होता. रशियनांना वाद मिटविण्यात स्वारस्य नव्हते. हे मानले तरी सैन्य मागे घेण्यापूर्वी युद्ध सुरू होण्यापूर्वीची जैसे थे परिस्थिती दोन्ही देशांनी आधी निर्माण करून मग अखेरीला सैन्य मागे घेण्याची तरतूद करारात करण्याचा आग्रह तरी भारतीय नेत्यांनी धरावयास हवा होता. परंतु सैन्य मागे घेण्याला करारात रशियनांच्या दडपणामुळे प्राधान्य दिले गेले. रशियनांना आपले पाकिस्तानातील प्रभावाचे क्षेत्र वाढविण्यासाठी पाकिस्तानला अडचणीतून बाहेर काढावयाचे होते. तथापि सैन्य मागे घेण्यापूर्वी 'जैसे थे' परिस्थिती निर्माण करावयाच्या आग्रहाला त्यांनाही विरोध करता आला नसता. परंतु भारतीय नेत्यांनी दाखविलेल्या धरसोडीच्या धोरणामुळे पाकिस्तानी

पाकिस्तानची उद्दिष्टे /११३