पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९५६ पर्यंत पाकिस्तान सरकारचे धोरण सतत भारताबरोबर संघर्ष करण्याच्या मनोवृत्तीने भारून गेले होते. काश्मीर हे भांडणाचे केवळ निमित्त होते. काश्मीर प्रश्न नसता तर संबंध सुधारले असते असे समजणे हास्यास्पद आहे. अखेरीला युद्धोन्माद निर्माण करण्याच्या या धोरणाचे पर्यवसान १९६५ च्या भारत-पाक युद्धात झाले आहे.
 हा उन्माद पाकिस्तानच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याच्या आणि आर्थिक ताकदीच्या आधारे प्रकट होत होता. भारतातील या काळातील परिस्थिती नीट समजावून घेतली पाहिजे. १९६२ ला भारत-चीन युद्ध झाले. या युद्धात भारताची पीछेहाट आणि नामुष्की झाली. पाकिस्तानने तेंव्हाच हल्ला केला असता. परंतु चीनला कोंडीत पकडण्याच्या तेंव्हाच्या धोरणानुसार अँग्लो-अमेरिकनांनी आयूबखानांना आवरले. (प्रा. जे. एच. गॅलब्रेथ यांच्या "Ambassador's Journal" या पुस्तकात याचे काही पुरावे सापडतात.) पाकिस्तानने तेंव्हा भारताच्या अडचणींचा फायदा घेऊन अँग्लो-अमेरिकनांच्या दडपणाने काश्मीर प्रश्नावर भारताला वाटाघाटी करण्यास भाग पाडले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत. (भुतोस्वर्णसिंग वाटाघाटी) त्या यशस्वी होणे शक्यच नव्हते. सबंध जम्मू आणि काश्मीर दिल्याखेरीज पाकिस्तानचे समाधान होणे शक्यच नव्हते आणि तो सबंध देणे हा देशातील कुठल्याही सरकारला शक्य नव्हते. वाटाघाटी फिसकटल्यावर पाकिस्तान पुढील संधीची वाट बघत बसले.

 नेहरूंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानने युद्धाचे पवित्रे टाकायला सुरुवात केली. याच्यामागील पाकिस्तानचे लोक व त्यांचे राज्यकर्ते यांची मनोवृत्ती समजून घेणे आवश्यक आहे. नेहरूंच्या मृत्यूनंतर भारतात अस्थिरता माजेल आणि त्याचा आपण पुरेपुर फायदा घेऊ असे पाकिस्तानला वाटत होते. (मी ऑगस्ट १९६२ मध्ये पश्चिम पाकिस्तानला भेट दिली होती. पाकिस्तानच्या सामाजिक क्षेत्रातील तसेच अन्य विविध थरांतील अनेक व्यक्तींशी माझे भारत-पाक प्रश्नावर स्वाभाविकच बोलणे झाले. त्यातील ९०% व्यक्तींनी नेहरूंच्या मृत्युनंतर आम्ही भारताचे बरेच लचके तोडून दाखवू असे मला सुनावले. असे म्हणणाऱ्यांत केवळ अशिक्षित सामान्य व्यक्ती नव्हत्या. सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी, वकील, डॉक्टर्स, इंजीनिअर्स इत्यादी समाजातील नेतृत्व करणाऱ्या वर्गाचा त्यात प्रामुख्याने भरणा होता. माझ्यापाशी व्यक्त केलेल्या या मतांचा सुगावा आपल्याला 'पाकिस्तान टाइम्स'च्या २६ नोव्हेंबर १९५५ च्या अग्रलेखात सापडतो. 'पाकिस्तान टाइम्स' ने म्हटले आहे, “भारताला एकत्र ठेवणारे नेहरूंचे व्यक्तिमत्त्व लोप पावल्यानंतर भारतातील फुटीर प्रवृत्ती वाढत जाणार आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर भारतात जो गोंधळ माजणार आहे त्याचा आम्ही फायदा घेतला नाही तर आम्ही मूर्ख ठरू. आम्ही भारताचे शत्रू आहोत हे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल.") कच्छचा हल्ला ही पुढील युद्धाची नांदी होती. पाकिस्तानच्या दृष्टीने ती भारताबरोबरील युद्धाची रंगीत तालीम होती. कच्छमध्ये पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारतीय नेतृत्वाने प्रत्युत्तर दिले नाही. भारताचे नेतृत्व कचखाऊ आहे ही अटकळ आयुबखानांनी बांधली आणि ती बरोबरही होती. या हल्ल्याला सार्वत्रिक युद्धाने उत्तर देण्याच्याऐवजी पंतप्रधान शास्त्रींनी सार्वत्रिक युद्धाचा एक इशारा देण्यावर वेळ मारून नेली. रशियासकट बड्या राष्ट्रांचे दडपण आणि

११२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान