पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/111

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभारताचे राजकीय संघटन होऊ नये या प्रयत्नाला लागले हे आधी चर्चिले गेलेच आहे. पाकिस्तानच्या आततायी भारताविरोधी वागण्याला काश्मीर प्रश्न कारणीभूत आहे असे भारतातील पाकिस्तानचे समर्थक नेहमी सांगत राहिले. वस्तुत: जीनांनी जुनागड सामील करून घेतले त्यावेळी काश्मीर प्रश्न अस्तित्वात नव्हता. त्रावणकोरला स्वतंत्र व्हायला उत्तेजन दिले त्यावेळीही तो अस्तित्वात नव्हता आणि हैदराबादची इत्तेहाद-उल-मुसलमीन ही संघटना बळकट करा असा त्या संघटनेचे नेते बहादुर नवाब जंग आणि कासिम रझवी यांना संदेश दिला. पुढे हैदराबाद स्वतंत्र ठेवायला सिडने कॉटन या अमेरिकनामार्फत विमानाने शस्त्रे पाठविली तेंव्हाही काश्मीर-प्रश्न उपस्थित झाला नव्हता. ही बहुतेक संस्थाने जीनांच्या हयातीतच भारतात सामील झाली, तेंव्हा भारतीय नेत्यांना पाकिस्तान नष्ट करावयाचे आहे ही जीनांनी भूमिका घेतली. (पहा - Mission with Mountbatten.) याचा अर्थ एवढाच होतो की भारतीय नेत्यांनी जीनांच्या डावपेचावर मात करून भारताचे राजकीय संघटन घडवून आणले आणि म्हणून जीना या कृत्याला पाकिस्तान नष्ट करण्याचे कृत्य मानू लागले. थोडक्यात, जीनांच्या डावपेचांना मोकळी वाट करून देणे आणि त्यांच्या इच्छेनुसार भारताचे विघटन होऊ देणे म्हणजेच पाकिस्तानचे अस्तित्व मान्य करणे असा होतो. किमान दोनदा त्यांनी भारताबरोबर राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता आणि काश्मीरप्रकरणी भारताबरोबर युद्ध करण्याचा त्यांचा बेत त्यांच्या ब्रिटिश सरसेनापतीने राजीनाम्याची धमकी दिल्यामुळे अंमलात येऊ शकला नाही. जीनांच्या मृत्यूनंतर वरकरणी भारताबरोबर मैत्रीचे संबंध व्यक्त करणारी निवेदने लियाकत अलीखान करीत राहिले. त्याचबरोबर पाकिस्तानी जनतेच्या भावना भारताविरुद्ध प्रक्षुब्धही करू लागले. १९५१ मध्ये कराची येथे त्यांच्या घरासमोर झालेल्या एका प्रचंड निदर्शनात त्यांनी भारताविरुद्ध वळलेली मूठ दाखविली आणि यापुढे आमचे हे प्रतीक राहणार आहे असे जाहीर केले.

 किमान दोनदा तरी त्यांच्या कारकीर्दीत भारत-पाकिस्तान तणाव विलक्षण वाढले. १९५० साली दंगलीमुळे निर्माण झालेल्या तणावाची चर्चा आधी आली आहे. नेहरूलियाकत करारात त्याचे पर्यवसान झाले. परंतु तणाव कधीच कमी झाले नाहीत. भारताने १९५१ च्या आरंभी पंजाबच्या सीमेवर सैन्य आणले या सबबीवर पाकिस्तानी प्रचारयंत्रणेने भारताच्या विरुद्ध जेहादचा प्रचार सुरू केला. यावेळी काश्मीर हे या तणावाचे कारण होते. भारताने पंजाबच्या सीमेवर सैन्य आणण्याची कारणे स्पष्ट होती. सुरक्षा समितीतर्फे काश्मीरवादात मध्यस्थी करायला ग्रॅहॅम हे भारतात आले आणि मुख्यतः काश्मीरमध्ये घटनासमिती बोलाविली गेली. (काश्मीर प्रश्नावर वेगळी सविस्तर चर्चा पुढे पहा. काश्मीरात शस्त्रसंधी आधीच जाहीर होऊन चुकला होती.) शस्त्रसंधी-रेषेचा पाकिस्तानने या काळात अनेकदा भंग केला. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर टोळीवाले आणि आपले स्वत:चे सैन्य पाठवून तेथे पुन्हा उपद्रव निर्माण करावा असा पाकिस्तानचा बेत असावा. नेहरूंनी प्रथमच काश्मीरवर हल्ला हा भारतावर हल्ला समजला जाईल असे जाहीर केले, यावरून पंजाब सीमेवर सैन्य नेऊन उभे करण्याच्या नेहरूंच्या धोरणाचा अर्थ लागतो. लियाकत अलीखान यांच्या मृत्यूनंतर काही दिवस नाझीमुद्दीन पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. पुढे आयूबखानांनी १९५८ मध्ये सत्ता

११०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान