पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राष्ट्रीय सार्वभौमत्व इत्यादी प्रश्नांना बाधा येते हे स्पष्ट आहे. भारतात कायद्याने जाती, धर्म, वंश, लिंग व भाषा या पलीकडे जाऊन सर्वांना समान नागरिकत्व व अधिकार आहे. परंतु बेरोजगारी, शिक्षण व आरोग्य यांचा अभाव, गरिबी, कुपोषण इत्यादी दैनंदिन प्रश्नांमुळे नागरिकांना समान अधिकारांपासून वंचित ठेवले जाते आणि धर्माने राजकारणात लुडबूड केल्यामुळे दैनंदिन प्रश्न दुर्लक्षिले जातात. वंचित व शोषित समाजाचा वापर करून समाजात तंटे-बखेडे माजविण्यासाठी कट्टरपंथीय सर्व त-हेचा प्रयत्न करतात असे दिसून येते. हमीद दलवाई हे अशा सर्व कट्टरपंथीयांविरुद्ध दंड थोपटून उभे असल्याचे दृश्य दिसते. विशेषतः आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजातील कट्टरपंथीयांविरुद्ध आपण सर्व बाजूंनी हल्ला करण्याची गरज आहे असे हमीद दलवाई अखेरपर्यंत मानीत होते. त्यांचे 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ' त्याच दिशेने आजही प्रयत्नशील आहे.

::::

 ईहवादी विचारांच्या हमीद दलवाई यांनी 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ' का स्थापले हे समजावून घेतले पाहिजे. मुस्लिम समाजाच्या कृतज्ञभावनेने मुस्लिम समाजात प्रबोधन कसे सुरू होईल याबद्दलची घोर चिंता त्यांना सतावीत होती.त्या कार्यासाठी वेळप्रसंगी प्राणार्पण करण्याची मानसिक तयारीही त्यांनी केलेली होती. कारण मुस्लिम समाजात प्रबोधनपर्व सुरू झाल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य सुकर होणार नाही अशी त्यांची खात्री होती. ख्रिश्चन समाजात मार्टीन ल्यूथरच्या सुधारणेमुळे आणि युरोपातील महाझंझावाती प्रबोधनयुगामुळे युरोपीय समाज आमूलाग्र बदलला आणि त्या समाजात आधुनिकतेचे मोकळे वारे वाहू लागले होते. त्यातूनच पुढे औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. भारतातील हिंदू समाजातही तेराव्या शतकापासून सुरू झालेली बहुजनवादी संतपरंपरा निर्माण झाली व समाज बदलू लागला. “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा" असे रोखठोक उद्गार संत तुकारामांनी सतराव्या शतकात काढले. अठराव्या शतकात राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध चळवळ सुरू करून आधुनिक शिक्षणालाही चालना दिली. एकोणिसाव्या शतकात तर महात्मा फुले यांनी मुलींसाठी आणि महार-मांगांच्या मुला-मुलींसाठी शाळा सुरू करून आणि भटशाहीविरुद्ध तुतारी फुकून समाजक्रांतीला चालना दिली. त्या पार्श्वभूमीवरच लोकहितवादी व न्यायमूर्ती रानडे यांचे कार्य पाहावे लागेल. मुस्लिम समाजाने मात्र, सर सय्यद अहमद यांनी सुरू केलेल्या अलीगढ चळवळीला कालांतराने जातीय वळण देऊन प्रबोधनाची ज्योत मंद केली होती. इकबालही पाकिस्तानवादी बनले व जीनांनी विनाशकारी अतिरेकी टोक गाठले. हमीद दलवाई यांच्या मते मुस्लिम समाजाने अलगता किंवा स्वत्व विसरणे या दोन मार्गाऐवजी आपले स्वत्व टिकवून व आपल्यात प्रबोधन घडवून राष्ट्रीय ऐक्याची कास धरण्याची गरज आहे. परंपरानिष्ठ अस्मितेऐवजी आधुनिक व राष्ट्रीय ऐक्याला पूरक अशी अस्मिता प्रबोधनाच्या साहाय्याने निर्माण केली पाहिजे. अमेरिकेमध्ये पूर्वी 'कढई सिद्धांत' प्रचलित होता. सर्व वंशीयांनी उकळत्या कढईत आपल्या अलग जाणिवा विसर्जित कराव्यात अशी कल्पना होती. आता त्याऐवजी 'फ्रूट सॅलडचा वाडगा' असा नवा सिद्धांत

१०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान