पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/104

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेओलीस धरण्याचा सुशिक्षित मुसलमानांचा मध्ययुगीन सिद्धांत कोलमडून पडला असता. कारण ओलीस धरायला पाकिस्तानात हिंदूच उरले नसते. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना हेही नको होते. थोडक्यात पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे धोरण पाकिस्तानातून हिंदूंची संपूर्ण हकालपट्टी करण्याचे नसून अंशतः हकालपट्टी करण्याचे होते. 'शो पीसेस' म्हणून काही हिंदू राहणेही आवश्यक होते. आपण मध्ययुगीन नसल्याचा डांगोरा पिटण्यासाठी पाकिस्तानी प्रचारयंत्रणेला त्यांची जरुरी होती. मात्र त्याचबरोबर पाकिस्तानच्या राजकीय जीवनात ते प्रभावी होऊ नयेत याचीही पुरेशी खबरदारी सगळे पाकिस्तानी राज्यकर्ते घेत होते. पूर्व बंगालमधून हिंदू मध्यमवर्गीयांना हसकावून लावण्यामागे हिंदूंचे नेतृत्व नेस्तनाबूत करणे हा एक हेतू होता. वेगळा मतदारसंघ १९६० पर्यंत कायम ठेवण्यामागेदेखील हिंदू अल्पसंख्यांकांना न्याय देण्याचा हेतू नव्हता. राष्ट्राच्या जडणघडणीत त्यांना समाविष्ट करून न घेण्याच्या सुशिक्षित मुसलमानांच्या निर्धाराचे ते प्रतीक होते. पाकिस्तानची घटना इस्लामी असेल असे प्रथम लियाकतअली खान यांनी जाहीर केले आहे. त्याआधीच जीनांनी कोलांटउडी मारली होती.

 जीनांच्या मृत्यूने पाकिस्तानातील त्यांनी रुजू घातलेल्या धर्मनिरपेक्षतावादाचे रोपटे उखडले गेले असे मानण्यात येते. हा समज बरोबर नाही. जीना जिवंत असते तरी त्यांनी घटनेला इस्लामी चौकट दिली असती आणि इस्लामने जगात प्रथम सेक्युलॅरिझम आणला असल्यामुळे घटनासमितीत आपण केलेल्या राज्याच्या धोरणविषयक निवेदनाशी ही घटना अजिबात विसंगत नाही अशी ग्वाही दिली असती. यात लियाकतअली खान जीनांचे सहकारी होते. त्यांना जर धर्मनिरपेक्ष राज्यघटना खरोखर हवी होती तर मग त्यांनी घटनासमितीच्या धोरणविषयक निवेदनात इस्लामचे तत्त्व कसे काय अंतर्भूत केले? जनमताच्या दडपणामुळे लियाकतअली खानांना जीनांच्या उच्च आदशांना मुरड घालावी लागली असे म्हणायचे तर जीनादेखील हयात असते तर अशी मुरड घालावी लागली असती असेही म्हणावे लागेल. वस्तुत: जीनांच्या कल्पना त्यांचे अनुयायी कोणत्या पद्धतीने अंमलात आणीत होते हे पाहणे मनोरंजक ठरेल. पाकिस्तानचे शिक्षणमंत्री महमूद हुसेन यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेवर अधिक प्रकाश टाकलेला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू आणि मुसलमान पाकिस्तानचे समान नागरिक आहेत. त्यांचे एक राष्ट्र नाही. मुस्लिम राष्ट्र वेगळेच आहे. (पहा-'Indo-Pakrelations' by Dr. Jyoti. Bhusan Dasgupta, Jaico Publishing House, Bombay, 1959,pp.218) याचा अर्थ द्विराष्ट्रवाद पाकिस्तानने सोडलेला नाही असा होतो. याचा अर्थ युरोपात पूर्वी काही अल्पसंख्यांक जमातींना वेगळ्या राष्ट्रीय जमाती म्हणून मानण्यात येई तसे पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्रात इतरांना मानण्यात येईल, मात्र सर्वांना नागरिक म्हणून समान अधिकार राहतील असा होतो. याचा अर्थ असा की पाकिस्तानी राष्ट्राची जडणघडण पाकिस्तानी मुस्लिम नागरिकांनीच करावयाची आहे. ती त्यांच्या कल्पनांनुसार होणारी आहे. या जडणघडणीत इतरांचा हिस्सा असणार नाही. मात्र त्यांना नागरिकत्वाचे सर्व अधिकार उपभोगता येतील. थोडक्यात, याला 'इस्लॅमिक सेक्युलॅरिझम' म्हणायला हरकत नाही. जगाच्या इतिहासात इस्लामने अनेक बऱ्यावाईट गोष्टींची भर टाकली आहे. जीनांनी या अशा 'इस्लॅमिक सेक्युलॅरिझम'ची अशीच भर

पाकिस्तानची उद्दिष्टे /१०३