पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणता लाभ होणार होता हे कळणे कठीण आहे. गांधीजींची भूमिका हे पैसे अडवू नयेत ही होती. पाकिस्तानचा अनुनय करण्याची गांधीजींची भूमिका असल्याचा जो अर्थ हिंदुत्ववादी लावतात तो खरा नाही. कारण पंचावन्न कोटींचा आग्रह धरण्यापूर्वीच काश्मीरमध्ये भारतीय सैन्य पाठविण्याचे समर्थन करून गांधीजींचा देशातील तथाकथित राजकीय पंडितांना आणि जीनांनादेखील चकित केले होते, ही बाब हिंदुत्ववादी सोईस्करपणे दडवून ठेवतात. पंचावन्न कोटी देण्याचा गांधीजींनी आग्रह धरला नसता तरी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचा खून केलाच असता. गांधीजींचा खून हा हिंदुत्ववाद्यांच्या हिंसेवर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि क्रूरतेचे अवडंबर माजविणाऱ्या राजकीय विचारप्रणालीचा बळी आहे. या प्रकरणात त्याची अधिक चर्चा मी करीत नाही.

 भारत-पाक संबंधांना दोन प्रकारे सतत कटुता येत राहिली. एक म्हणजे पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचा छळ, दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे भारताबरोबरचे शत्रुत्वाचे वागणे. छळ करायला पश्चिम पाकिस्तानात अल्पसंख्यांक फारसे राहिलेच नाहीत हे आपण पाहिले. पश्चिम पाकिस्तानातून एकूण चाळीस लाख हिंदू-शीख भारतात आले. दंगलीत किमान पाच लाख ठार झाले. किमान दोन लाखांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले. (पाकिस्तानातील दंगलीविषयी अधिक माहिती पुढील पुस्तकांत वाचा : 1. 'Divide and Quit'. 2. "Stern Reckoning', 3. 'Partition of Punjab') फार तर एक लाख हिंदू पश्चिम पाकिस्तानात राहिले आणि ते प्रामुख्याने सिंधमध्ये हैदराबादच्या आसपास राहू शकले. पूर्व बंगालमध्ये फाळणीच्या वेळी मोठ्या दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे तेथे हिंदूचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले नाही. याचे श्रेय जीनांकडे जात नाही-गांधींजींकडे जाते. फाळणी होणार असे दिसून येताच कलकत्त्याचे मुसलमान गर्भगळित झाले. जीनांच्या प्रत्यक्ष कृतिदिनादिवशी केलेल्या क्रूर कृत्यांची पापे लीगवाल्यांना भेडसावू लागली. सुम्हावर्दीसकट सर्वांनी गांधीजींकडे धाव ठोकली. फाळणीनंतर कलकत्त्यातील हिंदू कृतिदिनादिवशी केलेल्या दंगलींचा सूड उगवतील त्यांना तुम्ही आवरू शकाल असे सांगून गांधीजींना त्यांनी कलकत्त्याला राहण्याची विनंती केली. गांधीजींनी एका अटीसकट ही विनंती मान्य केली. पूर्व बंगालमध्ये आणि विशेषतः नौआखली जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्याची हमी आपण देत असाल तर मी कलकत्त्यात राहतो, असे गांधीजींनी सांगितले आणि जर तेथे दंगली झाल्या तर मला येथे हिंदूंना तोंड दाखविता येणार नाही, उपोषणाने आत्मसमर्पण करावे लागेल, असे म्हणून सु-हावींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दंगली न घडविण्याची प्रच्छन्न धमकीही दिली. (पहा - 'Last Phase' by Pyarelal.) गांधीजींच्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणून बंगालमध्ये तेव्हा मोठाल्या दंगली झाल्या नाहीत. पुढे पाकिस्तानात ज्या दंगली झाल्या त्या प्रामुख्याने पूर्व बंगालमध्ये होत राहिल्या. १९५० साली पूर्व बंगालमध्ये प्रचंड दंगली झाल्या आणि सुमारे पंधरा लाख हिंदू भारतात आले. या दंगलींची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्येही उमटली आणि तेथे मुस्लिमविरोधी दंगली झाल्या. १९५० च्या दंगलींची भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि पूर्व बंगालमध्ये सैन्य पाठविण्याची मागणी झाली. भारतातील. या प्रक्षोभामुळे लियाकतअली खानांनी दिल्लीला येऊन पं. नेहरूंशी वाटाघाटी सुरू केल्या आणि वेळ मारून नेली. हाच तो

भारत - पाक संबंध/९९