पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हिंदू जमातवाद्यांना हिंदू धर्मापेक्षा हिंदू राष्ट्र अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच सद्य:परिस्थितीत अधिक दाहकता निर्माण झाली आहे. त्या दाहकतेत या देशाचे काय होईल याची पर्वा हिंदू जमातवाद्यांना दिसत नाही. त्यांच्याबाबत हमीद दलवाई यांनी लिहिलेले प्रकरण अत्यंत उद्बोधक आहे.

::::

 हमीद दलवाई यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे की, ते अत्यंत प्रखर असे पुरोगामी व धर्मनिरपेक्षवादी राष्ट्रभक्त होते.थोर समाजवादी नेते एसेम जोशी यांनी १९४१ मध्ये सुरू केलेल्या राष्ट्र सेवादलामध्ये ते १९४६ साली सामील झाले. त्यातून त्यांनी जो समाजवादी विचारांचा अंगीकार केला तो आयुष्याच्या अंतापर्यंत कायम टिकला. समाजवादी आंदोलनातील डॉ. लोहिया, जयप्रकाश नारायण व एसेम जोशी यांच्याबद्दल त्यांना विशेष आदरभाव वाटत आला. गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी मनःपूर्वक साथ दिली आणि त्या स्वातंत्र्य लढ्यातून उदित झालेल्या संविधानातील मूल्यांना त्यांनी.आपली अव्यभिचारी निष्ठा अर्पण केली. ते मनाने पूर्णपणे ईहवादी असले व इंडियन सेक्युलर सोसायटीचे सदस्य असले तरीही संविधानात ग्रथित केलेल्या व व्यक्तीला अर्पण केलेल्या धर्मस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वत: धर्म न मानताही इतर व्यक्तींच्या धर्मस्वातंत्र्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला असता याची मला खात्री आहे. भारताची फाळणी झाली याबद्दल मुस्लिम जमातवादाचे नेते बॅ.जीना यांच्यावर तसेच संविधान न मानणाऱ्या मंडळींवर त्यांचा अत्यंत राग असे. भारतीय संस्कृती ही बहुरंगी व संमिश्र आहे, याबद्दल त्यांना नितांत अभिमान होता. या राष्ट्रामध्ये व्यापक संस्कृतीच्या मागे अनेकविध जाणिवा व उपसंस्कृती आहेत ही गोष्ट ते आग्रहपूर्वक मांडत असत. अशा या प्राचीन, प्रचंड लोकसंख्या असलेल्या आणि बहुविधतेने नटलेल्या राष्ट्रामध्ये एकात्मता कशी निर्माण होईल याची चिंता त्यांना रात्रंदिवस वाटत असे. यासाठी बहुसंख्य तसेच अल्पसंख्य समाजाने राज्य व धर्म अलग अलग ठेवले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. किंबहुना भारतीय इतिहासात, काही अपवाद वगळले तर, बहुसंख्य राजांनी स्वत:चा धर्म व राज्य यांच्यात कधी भेसळ होऊ दिली नाही. अशोक, अकबर व शिवाजी ही फार मोठी उदाहरणे आहेत. हिंदुराष्ट्र स्थापनेची भूमिका घेणाऱ्या संघपरिवारातील वाजपेयी व अडवाणी यांना सत्तेवर आल्यावर; वरकरणी का होईना; या भूमिका झकत घ्याव्या लागत आहेत ही गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे. हमीद दलवाई यांच्या मते भारतामध्ये आधुनिकतेवर भर दिला गेला, नागरी स्वातंत्र्य व कायद्याचे राज्य कटाक्षाने पाळले गेले, लोकशाही प्रणालीला निष्ठा अर्पण केली व नागरिकांनी धर्मस्वातंत्र्य पाळूनही राज्य व धर्म अलग ठेवले तर बहुसंख्य-अल्पसंख्य हा प्रश्न निश्चित संपेल.

 या प्रक्रियेत जर कोणाचा अडथळा असेल तर तो विविध धर्मीयांतील कट्टर पंथीयांचाच आहे. धर्मांध जमातवादी व त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुल्ला-मौलवी व साधुसंत यांच्यामुळेच अस्पृश्यता, गोवधबंदी, कुटुंबनियोजन, समान नागरी कायदा, स्त्रियांना समान अधिकार व

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/९