जन्म झाला झाला देव वंशा आले ।
उपासना चाले राघवाची ॥ २३ ॥
राघवाची भक्ति सुखाची विश्रांति ।
पितयाची शांति झाली पुढें ॥ २४ ॥
पुढे ज्येष्ठबंधु न सांगेंचि कांहीं ।
सुखें देवालयीं निद्रा केली ॥ २५ ॥
निद्रा केली तेथें श्रीरामें उठवूनी ।
तोचि मंत्र कानी सांगितला ॥ २६ ॥
सांगितला बोध रामीरामदासा ।
गुरूच्याहि वंशा निरोपिलें ॥२७॥
हनुमंत आमची कुळवल्ली । राममंडपी वेला गेली ।
श्रीरामभक्तीने फळली । रामदास बोले ॥१॥
आमुचे कुळी हनुमंत । हनुमंत आमुचे दैवत ।
तयावीण आमुचा परमार्थ । सिद्धीतें न पवे की ॥२॥
साह्य आह्मांसी हनुमंत । आराध्य दैवत श्रीरघुनाथ ।
गुरु श्रीराम समर्थ। उणें काय दासासीं ॥ ३ ॥
दाता एक रघुनंदन । वरकड लंडी देईल कोण ।
हे सोडोन आम्ही जन । कोणाप्रति मागावें ॥४॥
ह्मणोनि आम्ही रामदास । रामचरणीं आमुचा विश्वास ।
कोसळोनि पडो रे आकाश । आणिकाची वास[१] न पाहूं ॥५॥
स्वरूपसांप्रदाय अयोध्यामठ । जानकी देवी रघुनाथ दैवत ।
मारुती उपासक नेमस्त । वाढविला परमार्थ रामदासीं ॥६॥
- ↑ वाट.