पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रो. रानडे यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश


त्यामुळेंच भाषेच्या अभिवृद्धीवरून लोकांची स्थिति व लोकांच्या स्थितीवरून भाषेची अभिवृद्धि यांजबद्दल सहज अनुमान करतां येतें. आतां ही गोष्ट उघड आहे की,निरनिराळ्या देशांत निरनिरळ्या धर्मानेंं आणि निरनिराळ्या परिस्थितींत वागणाऱ्या लोकांचे विद्या, धर्म, नीति, व्यवहार किंवा त्यासंबंधाचे विचार बरेच भिन्न भिन्न असले पाहिजेत. अर्थात भिन्न भिन्न देशांतील लोकांच्या भाषेतील शब्दसमूहहि भिन्न भिन्न अर्थाचा द्योतक असला पाहिजे. अशा भिन्न भिन्न शब्दसंग्रहाची तुलना करणें म्हणजे अमेरिकेतील अँडीस, युरोपांतील आल्प्स आणि आशियांतील हिमालय यांपैकी कोणत्या तरी एका पर्वताचे वर्णन दुसऱ्या पर्वताच्या वर्णनांत असलेल्या शब्दांनीच व्यक्त करण्यासारखें आहे. मानवजातीच्या व्यवहारांत जे शब्द सामान्य असतात तेथें विशेष पंचाईत पडत नाही; पण प्रत्येक देशांतील लोकांच्या विशिष्ट विचारांचे, मनोधर्माचे किंवा मनोविकारांचे अथवा सुखःदुःखाचे चित्र ज्या शब्दांत असते तशा शब्दांची तुलना करण्याचा प्रसंग आला म्हणजे कोशकारांस पुष्कळ अडचण व त्रास पडतो. त्यांतून एक भाषा प्रगल्भ व दुसरी बाल्यावस्थेत असेल, तर ही अडचण कधी कधी इतकी दुर्घट होते की, परिभाषेतील शब्द जशाचा तसा ठेवून त्याचा कसाबसा विस्तृत अर्थ देऊनच काम भागवावें लागतें . एखाद्या नागरिक प्रौढ वधूच्या शृंगारांतील नखरा खेडेगांवांतील मुग्ध वधूजनांच्या विलासाने व्यक्त करणे जितकें अवघड आहे तितकेंच प्रौढ भाषेतील शब्दांचे निरनिराळे वाच्य किंवा व्यंग अर्थ त्यापेक्षा कमी दर्जाच्या भाषेतील शब्दांनी स्पष्ट करणे दुर्घट होय. त्यांतूनहि जेव्हां निरनिराळ्या भाषेतील म्हणींचा विचार किंवा तुलना करावी लागते तेव्हां पुष्कळ वेळां ही अडचण अपरिहार्य अशी भासू लागते. तथापि कोशकाराने जें काम पत्करलेलें असतें त्याच्या सांगतेस या सर्व अडचणींचां यथाशक्ति त्यास परिहार करावा लागतो. अर्थात् हें काम सर्वांशी पूर्ण होणे कधीच शक्य नसतें, पण पूर्व ग्रंथकारांच्या किंवा कोशांच्या साहाय्यानें आणि समकालीन विद्वत् समूहांच्या मदतीनें जेथवर मजल पोहोचविणें शक्य असेल तेथवर इष्ट कार्याची मजल नेणें हे प्रत्येक कोशकाराचे कर्तव्य आहे; आणि कोणत्याहि कोशाचें परीक्षण करते-वेळीं या सर्व गोष्टींचा अवश्य विचार केला पाहिजे. इंग्रजी भाषेचा पहिला कोश डॉक्टर जॉन्सननें केला, व तेव्हां भाषेच्या वाढीस अवश्य लागणारे लॅटिन व ग्रीक भाषेतील पुष्कळसे शब्द त्याने इंग्रजी कोशांत सामील केले, पण हल्लींचे इंग्रजी भाषेचें स्वरूप पाहिलें, तर या अवजड शब्दांच्या ऐवजी सोपे शब्द घालण्याची प्रवृत्ति नजरेस येते. तथालि एवढ्याच करितां जॉन्सन यांस दोष देणे कधीच वाजवी होणार नाही. भाषेची अभिवृद्धी पुढे कशी व्हावी याबद्दल जरी आज थोडेबहुत अनुमान करतां आलें, तरी पुढें अभिवृद्धि सर्वांशीं तशीच होते असे नाहीं सबब वाढत्या भाषेचा कोश करणारानें आपल्या किंवा आपल्या वेळच्या समजुतीप्रमाणें आपलें काम पुरें करून टाकणें एवढेच त्याचें कर्तव्य आहे व ते केलें म्हणजे त्याने आपले काम चांगल्या रीतीने बजावलें, असें म्हटलें पाहिजे.
 हे विचार सुचण्याचे कारण प्रो. एन्. बी. रानडे, बी. ए., यांनी विसाव्या शतकांतील इंग्रजी-मराठी कोशाचा आमच्याकडे पाठविलेला पहिला भाग होय. अशा प्रकारचा