पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दि ट्वेंटिएय सेंचुरी इंग्लिश मराठी डिक्शनरी १९०३ ते १९१६ या १३ वर्षाच्या काळात प्रसिद्ध झाली. १९०३ साली पहिला भाग प्रसिद्ध झाला, त्या वेळी लोकमान्य टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहून प्रा. रानडे यांच्या अभूतपूर्व शब्दकोश कार्याचा गौरव केला. अद्यापही प्रा.रानडे यांच्या शब्दकोशाशी तुलना होऊ शकेल असा दुसरा इंग्रजी-मराठी शब्दकोश उपलब्ध नाही. या पूनमुद्रित पुनर्मूद्रित आवृत्तीत लोकमान्य टिळकांचा अग्रलेख "केसरी" च्या सौजन्याने येथे संपूर्ण उद्धृत करत आहोत.


प्रो. रानडे यांचा

नवा इंग्रजी-मराठी कोश



 कोश आणि व्याकरण ही कोणत्याहि भाषेच्या उत्कर्षाची प्रधान अंगें होत. जामदारखान्यांत केवळ रत्ने पुष्कळ आल्याने भागत नाही, तर ज्याप्रमाणे जामदारखान्याच्या मालकाजवळ सदर रत्नांच्या रूपाची, वर्णाची व किमतीची याद असावी लागते, तद्वतच भाषेचे शब्दभांडागार वापरणाऱ्या लोकांची स्थिति होय. भाषेस जें प्रौढ स्वरूप प्राप्त होते ते त्यांतील शब्दसंचयामुळे होत असतें. पण आपणांजवळ शब्दसंचय आहे किती, असलेला पुरा नसल्यास नवीन किती मिळण्याचा संभव आहे. असलेल्या संचयाची योग्यता काय आणि त्याच्यामध्यें अर्थद्योतकपणा किती किंवा वतनदारी कोणत्या प्रकारची आहे हे जर नीट लक्षांत नसेल, तर शब्दसंचय पुष्कळ असूनहि त्याचा उपयोग चांगल्या रीतीनें करतां येणें शक्य नाहीं. भाषेस कोशाची आणि व्याकरणाची जी मदत होते तो याच कामी होय; आणि या कारणांमुळेच जगांतील नव्या-जुन्या सर्व प्रौढ भाषांचे कोश व व्याकरणे झालेली आपल्या दृष्टीस पडतात. व्याकरण हें वेदाचें मुख व निरुक्त हे कान आहेत, असे षडांगांतील दोन अंगासंबंधाने प्राचीन उल्लेख आहेत. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे कोश आणि व्याकरण हे दोनहि भाषेचे जीवप्राणच समजले पाहिजेत. ज्या सिद्ध पुरुषांच्या जिव्हाग्री सरस्वती वास करीत असते त्यांस कोशाची अगर व्याकरणाची तादृश जरूर लागत नाही. एवढ्यावरून कोश आणि व्याकरण ही साधनें भाषेच्या अभिवृद्धीस आवश्यक नाहीत असें जर कित्येकांचे मत असेल, तर तें अगदीं चुकीचें आहे. 'ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थानुधावति' हें वचन जरी खरें असलें, तरी सर्वच ग्रंथकारांचा अधिकार एवढा मोठा