Jump to content

पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महिला धोरणाचा आराखडा करायला घेणेसुद्धा केवळ निरर्थक आहे. स्त्रिया या निसर्गतः अनेक गुणांनी सुसज्ज असतात.सर्व आयुष्यामध्ये कौमार्य, गृहिणीपद, मातृत्व आणि प्रसंगी वैधव्यही स्वीकारण्या-पेलण्याइतकी त्यांच्याकडे शारीरिक आणि मानसिक क्षमता असते. प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील पेशीच्या केंद्रिकेमध्ये त्याचे शारीरिक गुणधर्म ठरवणारी २३ गुणसूत्रे (Chromosomes) म्हणजे जनुकांच्या (Genes) जोड्या असतात. या २३ जोड्यांपैकी २२ जोड्यांतील जनुके सारखी असतात. २३व्या जोडीतील जनुके मादीच्या बाबतीत सारखी तर नराच्या बाबतीत भिन्न असतात. मनुष्यप्राण्याच्या बाबतीत स्त्रीपेशीमध्ये ही जोडी (X,X) तर पुरुष पेशीमध्ये (X,Y) अशी असते.
 नवीन जन्माला येणाऱ्या जीवाला स्त्रीबीजापासून X जनुक मिळते तर बापाकडून X किंवा Y जनुक मिळते. त्यानुसार नवीन जीव स्त्री का पुरुष ते ठरते. नंतरच्या काळात एका विशिष्ट वर्गाच्या हितरक्षणार्थ पुरुष आणि प्रकृती यांचे तत्त्वज्ञान निघाले आणि स्त्री म्हणजे जमीन व पुरुष म्हणजे बीज पेरणारा अशी तद्दन अशास्त्रीय कल्पना समाजात रूढ झाली. त्याबरोबरच, ब्राह्मणी तत्त्वज्ञानामुळे सर्व विश्वाचा नियंता कोणी एक पुरुष आहे अशी खुळचट कल्पनाही रुजली. या कल्पनेचा प्रभाव अजूनही ब्राह्मण समाजात आणि त्यांच्या गोत्रव्यवस्थेत दिसून येतो. गोत्रांचे सर्व प्रवर हे प्राचीन ऋषिमुनी आहेत. अनेक स्त्रिया विदूषी झाल्या, तत्त्ववेत्या झाल्या. काहींनी तर वेदांतील ऋचाही रचल्या, पण गोत्रांच्या प्रवरांत कोणाही स्त्रीची गणना होत नाही. शेतजमीन म्हणजे स्त्री आणि बीज पेरणारा पुरुष या विचित्र कल्पनेचा आणखी एक भयानक परिणाम नंतर दिसून आला. स्त्री भ्रूणहत्या हा शासनाच्या महिला धोरणांच्या सगळ्या आराखड्यांचा प्रमुख विषय आहे. त्यांत स्त्रियांवरील अत्याचारांइतकेच महत्त्व स्त्री भ्रूणहत्येलाही देण्यात आले आहे.
 शास्त्रीय सत्य असे आहे की, बापाकडे लिंगविशेष गुणसूत्रातील जनुक देण्याची ताकद आहे किंवा नाही हा तुलनेने कमी महत्त्वाचा विषय आहे, पण पुरुषी दुर्बलतेची सुरुवात ही त्याच्याकडून मिळणाऱ्या जनुकापासूनच सुरू होते. स्त्रीच्या गर्भाशयात प्रवेश करण्याआधीच्या मार्गात या जनुकाला तेथील अतिरिक्त आम्लतेचा प्रतिकार करण्याची वेळ आली तर ते नष्ट होऊन जातात आणि शेवटी गर्भ मुलीचा राहतो.

 एकापाठोपाठ एक मुलीच झाल्या तर त्याचा दोष केवळ आईचा किंवा बापाचा नसतो. दोघांच्या जोडीतील विसंगतीतून ही समस्या तयार होते. मुळात

राखेखालचे निखारे / ३५