पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक व्यवस्था आणली. त्या व्यवस्थेचे राजाजींनी केलेले वर्णन 'लायसन्स-परमिट-कंट्रोल-कोटा राज्य' असे आहे. खरे म्हणजे हिंदुस्थानातील समाजवादाची कल्पना ही अशा तऱ्हेच्या रशियन समाजवादाची नव्हती. नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया यांची समाजवादाची कल्पना म्हणजे 'कसणाऱ्यांची जमीन आणि श्रमणाऱ्यांची गिरणी' अशी होती. त्याच्याऐवजी 'सर्व मालमत्ता सरकारच्या स्वाधीन' अशा तऱ्हेची व्यवस्था आणण्याचे आणि राबवण्याचे काम नेहरूंनी आणि त्यांच्या प्रियदर्शिनी कन्येने केले आणि अशा लायसेन्स-परमिट-कंट्रोल-कोटा राज्यातूनच अनेक प्रकारच्या समस्या तयार झाल्या. त्याच्यामध्ये गुंडगिरी आली, कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव आला आणि त्याबरोबरच महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशासारख्या समस्याही नेहरूंच्या लायसन्स-परमिट-कंट्रोल-कोटा राज्यातूनच निर्माण झाल्या.
 राजकारणी नेत्यांनी गुंडगिरीच्या कामात हळूहळू प्रवेश केला. सुरुवातीला गुंडांच्या टोळ्या आणि त्यांचे बाहुबल व धन वापरून नेत्यांनी निवडणुका जिंकल्या आणि सत्ता संपादन केली. लवकरच पुढाऱ्यांची ही युक्ती गुंडांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वतःच राजकारणात उतरण्याचे प्रयत्न सुरू केले. १४व्या लोकसभेत गुंड आणि खुनी, खासदार म्हणून मोठ्या संख्येने निवडून आले ते यामुळेच. गुंड आणि राजकीय नेते यांची युती देशाला फार घातक ठरत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातसुद्धा लँड माफिया जो हैदोस घालत आहेत त्यापुढे सर्वसामान्य आणि सुशिक्षित लोक हतबल होऊन पाहण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. कोलमडलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे देशाचा विकास ठप्प झाला आहे. कायदा व सुव्यवस्था बळकट झाल्याशिवाय विकासाची वाट मोकळी होणे केवळ अशक्य आहे.

(दै. लोकसत्ता दि. ६ मार्च २०१३)

राखेखालचे निखारे / २८