तर समाजात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत असणे आवश्यक असते. त्यामुळे इंग्रजांनी हिंदुस्थानात, ॲडम स्मिथच्या विचाराप्रमाणे, कोणत्याही सुधारणा आणण्यापूर्वी प्रथमतः कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आपल्या देशात त्या वेळी गुंडागुंडांचा म्हणजे पेंढारी आणि ठग यांचाच कारभार चालू होता आणि त्याखेरीज, इतर अनेक संस्थानिकसुद्धा असे पेंढारी व ठग पदरी बाळगून त्यांच्याकडून पुंडगिरी करवून त्यांच्या मिळकतीवर जगत असत. इंग्रजांनी येथे आल्यावर सर्वप्रथम कोणता कार्यक्रम हाती घेतला असेल तर तो म्हणजे पेंढारी आणि ठग यांचा बंदोबस्त करण्याचा. यामुळे जंगलांच्या उत्पन्नावर जगणाऱ्या आदिवासी समाजात फार मोठा रोष तयार झाला आणि त्यांनी पहिल्यांदा इंग्रज सरकारविरोधात बंड उभे केले. इंग्रज सरकारने या बंडांचा बीमोड काहीशा क्रूरतेने केला हे खरे, पण त्यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्था तयार झाली आणि लोकांच्या मनामध्ये 'काठीच्या टोकावर सोने-जडजवाहिरांचे गाठोडे बांधून काशीला निर्धास्त जावे' इतका विश्वास तयार झाला. अशी परिस्थिती तयार झाल्यावरच मग इंग्रजांनी हळूहळू सुधारणांचे कार्यक्रम हाती घेतले.
प्रत्यक्षात परिस्थिती अशी की, इंग्रजांच्या काळीही जे सामाजिक कायदे झाले त्या कायद्यांतील एक सतीबंदीचा कायदा सोडल्यास इतर कोणत्याही कायद्याने सामाजिक सुधारणेचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. उदाहरणार्थ, संमतिवयाचा कायदा. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर स्वतः महात्मा गांधींनीच 'एक दिवस जरी माझ्या हाती सत्ता आली तर मी दारूबंदी करीन' अशी घोषणा केली. त्याचा उपयोग करून त्यांच्या शिष्यवरांनी म्हणजे मोरारजी देसाईंनी मुंबईसारख्या, पोलिस प्रशासन अत्यंत व्यवस्थित असलेल्या इलाख्यात दारूबंदी लावली. दारूबंदीचा कार्यक्रम सगळ्या जगामध्ये कोठेही यशस्वी झाला नाही, तसाच तो हिंदुस्थानातही झाला नाही. त्याचे कारण असे की, कोणत्याही शेतीपदार्थापासून दारू सहज तयार करता येते, हे लक्षात घेतले म्हणजे हातभट्टी चालू करणे हा नेहमीचा 'ग्रामोद्योग' सुरू होतो आणि हिंदुस्थानसारख्या दारिद्र्याने ग्रासलेल्या, बेकारी माजलेल्या प्रदेशामध्ये अशा तऱ्हेने दारू गाळणाऱ्यांची संख्या भरमसाट वाढली. त्याचा परिणाम असा झाला की सारे पोलिस खातेच भ्रष्ट होऊन गेले आणि त्यांनी लाच खाऊन, अशा तऱ्हेच्या हातभट्ट्या आपल्याला माहीतच नव्हत्या, असे दाखवण्यास सुरुवात केली.
स्वातंत्र्य प्रत्यक्ष हाती आल्यानंतर पंडित नेहरूंनी समाजवादाच्या नावाखाली