पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती?


 शोषणाच्या अनेकविध लढायांत आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याच्या आपल्याकडे आलेल्या जबाबदारीमुळे स्त्रियांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून जे काही बदल करून घेतले तोच त्यांचा स्वाभाविक गुणधर्म मानला जाऊ लागला. त्यायोगे त्यांना दुय्यम स्थान पत्करावे लागले आणि पुरुषांच्या अंगी, ते जैविकदृष्ट्या स्त्रियांच्या तुलनेत कमकुवत असूनही अनैसर्गिक विक्राळपणा बाणत गेला. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकरी संघटनेने स्त्रीशक्तीच्या जागरणातून 'स्त्री-पुरुषमुक्ती'चा मार्ग म्हणून स्त्रियांचे आत्मभान जागे करण्यासाठी अभियान सुरू केले. त्याची सुरुवात चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनाने झाली.

 ९ व १० नोव्हेंबर १९८६ ला चांदवड (जि. नाशिक) येथे शेतकरी महिला अधिवेशन झाले. स्त्री चळवळीतील वेगवेगळ्या संघटनांनाही आमंत्रित केले होते. चांदवडच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे ठराव झाले. त्या ठरावांतील एक महत्त्वाचा ठराव म्हणजे त्या सुमारास घडलेल्या दिल्लीतील शीखविरोधी दंगलीत ज्या स्त्रियांवर बलात्कार झाले त्या प्रकरणांची चौकशी व्हावी व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी काय होती हेही पुराव्याने पुढे यावे याकरिता दिल्लीत स्त्रियांचा एक मोठा मोर्चा काढायचे ठरले होते. यासाठी शेतकरी आणि शहरी महिलांची एकत्र अशी 'समग्र महिला आघाडी' ही तयार करण्यात आली. पण शहरी महिला कार्यकर्त्यांनी त्यातून अंग काढून घेतले. यातून एक धडा शिकावयास मिळाला तो हा की स्त्रिया विरुद्ध पुरुष असा संघर्ष इतिहासात कधीही झालेला नाही आणि होणे नाही. सर्व स्त्रिया वर्गीय पूरकतेपेक्षा जैविक एकतेला अधिक मानतात; पण सर्व वर्गाच्या स्त्रिया आपापल्या पुरुष मंडळींचाच पाठपुरावा करतात. शेतकरी संघटनेच्या विचारातही मार्क्सच्या वर्गसंकल्पनेचा विरोध करताना एकसमान घटकांची संघटना बनत नाही; संघटना बनण्यासाठी त्यातील घटक परस्परपूरक असावे लागतात, असेही मत मी मांडले होते.

राखेखालचे निखारे / २१