पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/१४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


स्त्रियांचे प्रश्न अन् चांदवडची शिदोरी


 माझ्या हातून एंगल्सच्या The origin of family, the private property and the State या पुस्तकाचा प्रतिवाद करणारे एक पुस्तक लिहिले गेले आहे - The women's Question. त्याबरोबर चांदवडच्या प्रचंड महिला अधिवेशनाच्या तयारीसाठी महिलांना पूर्वतयारी म्हणून 'चांदवडची शिदोरी' ही पुस्तिकाही माझ्या हातून लिहिली गेली आहे, पण तरीही मी स्वतःला महिला विषयातला जाणकार किंवा तज्ज्ञ मानत नाही.
 शेतकरी संघटना जशी माझ्या हातून होऊन गेलेला एक चमत्कार आहे, त्याचप्रमाणे शेतकरी महिला आघाडी हा माझ्या हातून घडलेला त्याहूनही मोठा चमत्कार आहे. या चमत्काराची सुरुवात १९८२ साली जानेवारी महिन्यात शेतकरी संघटनेच्या सटाणा येथील पहिल्या अधिवेशनात झाली. त्या अधिवेशनात त्या वेळी हयात असलेल्या माझ्या पत्नीने- लीलाने पहिले भाषण केले आणि त्या भाषणात शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर शेतकरी महिलांचीही संघटना असायला पाहिजे, अशी बाजू मोठ्या परिणामकारकरीत्या मांडली होती. सौ. लीला गेल्यानंतर माझ्या मनात एका अपराधी भावनेपोटी, महिलांचे काहीतरी काम घडावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.

 त्यानंतर एक प्रसंग घडून आला. विदर्भात मी गेलो म्हणजे वर्धा येथील रवी काशीकर यांच्या घरी माझा मुक्काम असे. मी मुक्कामाला असलो की सहजच पाच-पंचवीस कार्यकर्ते मुक्कामाला आणि त्यासंबंधीच्या प्रचारयात्रेमध्ये असत. त्या वेळी स्वयंपाकघर सांभाळण्याचे काम सरोज वहिनींवर पडे. सकाळच्या नाष्ट्याला रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांना कांदा-मिरचीची फोडणी घालून बनविलेला शिपोतू नावाचा एक पदार्थ सर्वाना खूप आवडे, त्याचे काही वेगळे काम पडत नसे. तरीही एके दिवशी सरोज वहिनींनी तक्रार केली की, बाहेरच्या दिवाणखान्यात तुम्ही पाच-पंचवीस कार्यकर्ते घेऊन बसता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करता, त्यात आमचा सहभाग कोठेच नाही. ही तक्रार लक्षात घेऊन घरमालक रवी

राखेखालचे निखारे / १७