पान:रससूत्र (Rasasutra).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धारा असते. भरत हा जरी पूज्य असला तरी मतंग-कोहलादी, भामह-वामनादी ज्येष्ठ विचारवंत आदरणीय असतातच. त्यांचा व स्वतःच्या भूमिकेचा समन्वय ही एक धारा असते. शिवाय भरतमुनी काही स्वतःचे मत सांगत नव्हते. ते ब्रह्मदेवाचे म्हणणे स्वर्गात बसून ऋषींना समजावून सांगत होते. आणि ब्रह्मदेव सर्व वेदांच्या- मधून एक-एक भाग ग्रहण करून नाट्यवेद सिद्ध करीत होते. म्हणून तर नाट्यवेद पूज्य व पुण्यप्रद झाला आहे. ह्यामुळे ओघानेच एक जबाबदारी येते, ती म्हणजे श्रुतींचे सार असणारे औपनिषदिक चिंतन व नाट्यशास्त्र यांचा समन्वय करण्याची. इतर पूज्य दर्शने व नाट्यशास्त्र ह्यांच्या समन्वयाची एका परंपरानिष्ठेचा पोटात अंतर्भूत असणाऱ्या समन्वयवादाच्या ह्या चार प्रमुख धारा आहेत.
 ह्या परंपरानिष्ठ समन्वयवादाचा परिणाम असा होतो की कधी नवे शब्द वापरून जुन्याच कल्पना सांगितल्या जातात, तर कधी जुने शब्द वापरून नवे विचार सांंगितले जातात. प्राचीन व मध्ययुगीन भारतातच हे घडले असे नाही. परंपराप्रेमाच्या पोटी आधुनिकांनी सुद्धा ह्या पद्धतीचा विपुल प्रमाणात वापर केला आहे. सत्य असे आहे की रससिद्धांत ह्या नावाचा एकच एक सिद्धांत नाही. तो एका नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परस्पर संलग्न अशा अनेक भूमिकांचा समूह आहे. परंपराप्रधान जीवनात परस्परविरोधी विचारांचे ताण असतातच, तसे ताण प्राचीन भारतातही आहेत. फक्त हे ताण कुणी मान्य करीत नाही. मनोरंजन व सुख हे क्षेत्र, धर्म व, उपदेशापेक्षांं भिन्न मानणारे व मनोरंजनाला महत्त्व देणारे काहीजण आहेत. उपदेश व बोध सर्वोत महत्त्वाचा समजून सर्वच ठिकाणी त्याचे प्रभुत्व मानणारे काहीजण आहेत. उदा. काहीजण नाट्य, नृत्य हा कामज व्यवहार मानतात; काहीजण नाट्य वेदातून जन्मलेले मानतात. भामहासारखे काही विचारवंत काव्य हा अर्थ-पुरुषार्थाचा भाग मानतात, ( काव्यालंकार १/२०.२१). पण हे परस्पर भिन्न विचार समन्वय करूनच प्रतिपादन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे रस-सिद्धांताची चर्चा कमालीची गुंतागुंतीची असल्यामुळे तो कसा मांडावा हे समजत नाही. अला काही प्रकार माझ्याबाबत होऊ लागला आहे.
 कोणत्याही पद्धतीने मी रसविचार मांडला तरी तो गुंतागुंतीचाच ठरणार आहे. विस्कळितपणा, पुनरुक्ती आणि अपुरेपणा टाळण्याचा मार्ग मला तरी सध्या दिसत नाही. एक अभिनवगुप्त घ्यावा आणि त्याचे विवेचन योग्यही कसे आहे, भरत संमतही कसे आहे हे सांगून इतर सर्वांना बाधित पक्ष ठरवावे ह्या प्रवृत्तीत मला रस नाही. संस्कृतमधील रसव्यवस्था हा माझ्यासाठी येनकेनप्रकारेण समर्थन करण्याचा व श्रद्धा ठेवण्याचा भाग नसून अभ्यासाचा भाग आहे. ह्या प्राचीन विवेचकांना प्रश्न कसे जाणवले हे समजून घेण्यात मला रस आहे. सर्वच आदरणीय पूर्वसरी आहेत. कुणाही महत्त्वाच्या भाष्यकाराचे विवेचन पूर्णपणे बाधित झाले आहे असे मला वाटत नाही.