पान:रससूत्र (Rasasutra).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तरे दिली ती आपण कदाचित मान्य करणार नाही. पण हे सारे प्रश्न त्या विचारांची मांडणी करणाऱ्यांंच्या समोर होते हे महत्त्वाचे आहे. रस-व्यवस्थेचा हा व्याप पाहिला तर सर्व प्रकारचा आदर बाळगून हे म्हणणे भाग आहे की अरिस्टॉटलच्या अनुकरण सिद्धांताधारे वा कॅथर्सिसच्या सिद्धांताधारे ह्या प्रश्नाची उत्तरे देता येतील. पण ती आपणांस द्यावी लागतील. ती मुळी अँरिस्टाटलला जाणवलेली, त्यांच्यासमोर असणारी प्रश्नावली नाही. कवीपासून रसिकापर्यंत असणाऱ्या सर्व व्यवहारांचे सुसंगतवार व.एकसूत्री उत्तर देण्याचा त्याचा प्रयत्न नाही.
 असा एखादा महत्त्वाचा व व्यापक सिद्धांत असला म्हणजे सर्वच प्रश्नांच्या बाबतीत हा सिंंद्धांत अपुरा व असमाधानकारक ठरण्याचा धोका पत्करला पाहिजे. कधी कधी, तर समोर असणाऱ्या प्रश्र्नांंच्या संदर्भात सगळे विवेचन अप्रस्तुत ठरत आहे की काय असे वाटू लागते. आपणच उभारलेल्या तर्कशास्त्राच्या चौकटी, आपणास गृहीत असणाऱ्या आध्यात्मिक भूमिका, ह्यांच्याशी वैचारिक सुसंवाद राखण्याच्या प्रयत्नात आपण वाडमयीन सत्यापासून कुठेतरी दूूर भटकत जातो आहो काय असेही केव्हा केव्हा वाटू लागते. ह्या साऱ्याच बाबी रसचर्चेत घडत आलेल्या आहेत. पण तरीही त्यामुळे ह्या सिद्धांताचे महत्त्व कमी होत नाही. प्राचीन धर्मप्रधान जगात सर्वोत पूज्य असेल तर तो धर्माने इप्सित म्हणून पुरस्कारलेल्या ज्ञानाचा अनुभव. ह्या अनुभवाच्या शेजारी, कलात्मक आस्वाद प्रस्थापित करणारी भूमिका रसव्यवस्थेची आहे. वेगळ्या भाषेत सांगायचे तर योग्याची प्रतिष्ठा कवीला देणारी ही भूमिका आहे. अशा सिद्धांतावरील चर्चा संपत नसते. ती संपावी, ही अपेक्षा करणेच अनुचित असते. अजून एक तिसरी महत्त्वाची बाब आहे. ती बाब ही की ह्या सिद्धांताच्या मागे पार्श्वभूमी म्हणून परपरानिष्ठ, समन्वयवादी, असे भारतीय मन आहे. खरे म्हणजे परंपरानिष्ठ मन म्हटल्यानंतर ते पुन्हा समन्वयवादी आहे असे सांगण्याची गरज नसते. परंपरानिष्ठ मन, एकीकडे स्वतःला नव्याने जाणवणाऱ्या बाबी आणि परंपरा यांचा समन्वय करीत असते. दुसरीकडे परंपरेत असणाऱ्या विसंवाद आणि विरोधाचाही समन्वय करीत असते. परंपरानिष्ठेत समन्वयवाद गृहीतच असतो. ह्या भूमिकेमुळे प्रत्येकं विचारवंत आपली मते परंपरामान्य भरतमुनींच्या वचनांचा आधार घेऊनच मांडीत असतो. प्रतिपादनाच्या ह्या विशिष्ट शैलीमुळे समन्वयवादाच्या अनेक धारा एकाच वेळी प्रवाहित होत असतात. ह्या प्राचीनांना नाट्यशास्त्र हा एक संग्रह ग्रंथ आहे व भरतमुनी काल्पनिक आहे असे वाटत नाही ते भरताला वास्तविक मुनी मानतात. ह्या मुनीचा नाट्यशास्त्र हा पूज्य व प्रमाण ग्रंय आहे. म्हणून समन्वयवादाची एक धारा नाट्यशास्त्रातील परस्पर विसंगत व परस्पर विरोधी वचनांचा समन्वय लावीत असते. रसचर्चेतील प्रमुख समीक्षकांना आपल्या दर्शनाचा अभिमान आहे. म्हणून स्वतःची दार्शनिक भूमिका व नाट्यशास्त्र यांचा समन्वय साधणारी एक