पान:रससूत्र (Rasasutra).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ह्या क्षेत्रात कोणतीहींं भूमिका अंतिम व सर्वोगपरिपूर्ण, सर्व समाधानकारी अशी नसते. सर्वच उत्तरे विवाद्द असतात. खरे म्हणजे ह्या क्षेत्रात उत्तरांच्यापेक्षा प्रश्न महत्त्वाचे असतात. जे प्रश्न रस-व्यवस्था चर्चिण्यासाठी डोळ्यांसमोर ठेवले ते प्रश्न आजही समाधानकारकपणे उत्तरित झाले आहेत असे म्हणता येणार नाही. प्राचीनांची परिभाषा सोडूनंं साध्या भाषेत प्रश्न मांडायचा झाला तर प्राचीनांच्यासमोर एक प्रश्न असा आहे. कलांच्यामध्ये आकर्षकता आहे ह्यात वाद नाही.खऱ्या जीवनापेक्षा हे कलांचे जग अधिक आकर्षक व प्रभावी असते. ह्या आकर्षणाचा व प्रभावाचा उगम आहे कुठे ? वाड्मय प्रभावी असते. ते आपल्या आस्वादकाचे मन भारून टाकते. हे म्हणणे म्हणजेच साहित्याची परिणामकारकता मान्य करणे आहे. ह्या परिणामकारकतेचा उपदेशाशी व आकर्षकतेशी संबंध कोणता आहे ? हा एक प्रश्न झाला. असे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांचे सर्वकालीन महत्त्व निर्विवाद आहे. रससिद्धांत ह्या शाश्वत प्रश्नांची उत्तरे देण्याचा सर्वोत भव्य, सर्वोत महत्त्वाचा प्रयत्न आहे. नोलीसारखे इटालियन अभ्यासक. ज्यावेळी असे म्हणतात की अभिनवगुप्ताला जे जाणवले तेथपर्येंंत जाण्यासाठी पाश्चिमात्य जगाला पॉल व्हॅलरीपर्येंंत वाट पाहावी लागली. त्यावेळी हे अभ्यासक ह्या सिद्धांताचे जगाच्या संदर्भात शाश्र्वत महत्त्व सांगत असतात. मानव जातीच्या संदर्भात जसा आँरिस्टॉटल कालबाह्य ठरण्याचा संभव नाही तसा भरतही कालबाह्य ठरण्याचा संभव नाही. रससिद्धांत ही अशी समर्थ भूमिका आहे.
 ह्या क्षेत्रात कोणतीच भूमिका निर्विवाद नसते. ह्या सत्याची दुसरी बाजू ही आहे की सर्वच भूमिकांना काही शाक्ष्वत सत्याचा आधार असतो. हे सत्याचे अंश त्या भूमिकेचे सामर्थ्य असतात. पुन्हा एकदा परिभाषा सोडून प्रश्न नव्या भाषेत मांडतो. कलांचे आस्वाद व प्रत्यय भावगर्भ असतात हे सर्वसामान्य सत्य आहे. लौकिक जीवनातील तीव्र भावावेश असणारे अनुभव आणि हे कलांचे अनुभव ह्यांत, काही सारखेपणा आहे तसे या दोहोत महत्त्वाचे फरक आहेत. हा दोन्ही गटांतील अनुभवांचा संबंध काय ? रसिकांचे अनुभव व कवींचे अनुभव ह्यांचा संबंध काय ? त्या संबंधांचे माध्यम कोणते ? कलांच्या भावगर्भ प्रत्ययाचे जे स्वरूपविवेचन आपण करू त्या विवेचनात ह्या प्रश्नांची उत्तरे अंतर्भत अनुस्यूत असली पाहिजेत. ह्या स्वरूपविवेचनाने एकीकडे कलांचे व्यवच्छेदक लक्षण दिले पाहिजे तर दुसरीकडे कलांच्या मूल्यमापनांच्या कसोट्या दिल्या पाहिजेत. ह्या विवेचनात एकीकडे सर्व कलात्मक व्यवहाराला समान असणारा, आधार सापडला पाहिजे तर दुसरीकडे प्रत्येक कलाप्रकाराचा निराळेपणा, प्रत्येक कलाकृतीचे पृथकत्व सांगण्यास आधार सापडला पाहिजे. व्यक्ति वातावरणविचार आणि कृती ह्यांचा या भावगर्भतेशी संबंध कोणता ? मानवी जीवनात ह्या अनुभवांचे महत्त्व काय हेही सांगितले पाहिजे. ह्या सर्व प्रश्नांची एका सूत्रात उत्तरे देणारा जगाच्या इतिहासातील हा पहिला सिद्धांत आहे. रसव्यवस्थेने ह्या प्रश्नांना जी