पान:रससूत्र (Rasasutra).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समीक्षकांची समीक्षाच फिरत राहिली नाही तर कलावंतांनी सुद्धा हा सिद्धांत स्वाभाविकरीत्या स्वीकारून अभिव्यक्ती केलेली आहे. प्राचीन व मध्ययुगीन भारतीय कला व्यवहाराचे सारे सामर्थ्य आणि ह्या व्यवहारातील उणिवांचा उदय ह्या सिद्धांतात होतो. हिंदीसारख्या भाषेत रीतिकालासारखा- एक वाङ्मयीन कालखंड असा आहे की जेथे लेखकांनी अलंकारशास्त्र आणि काव्य एकमेकांत मिसळूनच टाकलेले आहे.
 प्राचीन भारतीय काव्य, साहित्य, कलाव्यवहार ह्यांचे मोठेपण व सामर्थ्य सर्वमान्य आहे. भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा हा फार मोठा संचय आहे. हा वारसा श्रद्धेने आणि पूजाबुद्धीने वाटल्यास आपण पाहणार नाही. पण त्याचा ममत्वबुद्धीने अभ्यास तर केलाच पाहिजे. ह्या सांस्कृतिक वारसाचे सर्व सामर्थ्य रसचिंतनातून उदयाला येते. सर्व अभिजात प्राचीन साहित्याची महत्त्वाची मर्यादा ही आहे की त्यात वास्तववादाच्या जाणिवेचा अभाव फार जाणवतो. ज्यावेळी आपण असे म्हणतो की ह्या वाड्मयात समोर असणाऱ्या कठोर समाज जीवनाचे दर्शन होत नाही. लौकिक सामान्य जीवनातील व्यक्ती व त्यांचे प्रश्न तेथे गंभीरपणे पाहिले जात नाहीत. शोकांतिकेचा त्या जीवनात अभावच दिसतो. भाषा, शैली, अलंकार, कथानक ह्या बाबत साचेबंद तोच तोपणा व कृत्रिमता सर्वत्र दिसते. संकेताच्या मर्यादेमुळे ह्या वाङ्मयाचा ताजेपणा हरवल्यासारखा दिसतो. नटवेपणा जाणवतो, असे आक्षेप त्यावेळी अभिजात संस्कृत वाङ्मयावर व पुढच्या मध्ययुगीन देशी साहित्यावर घेतले जातात. त्यावेळी वेगवेगळ्या पातळीवरून वास्तववादाच्या जाणिवेच्या अभावाचाच मुद्दा सांगितला जात असतो. ह्या मर्यादेचा, उणिवेचा उगमही रस सिद्धांतातच आहे.
 ज्यावेळी रस हा काव्य नाटकाचा आत्मा मानला जातो त्यावेळी तो सारभूत मुद्दा असतो. गुणालंकारादी इतर घटकांना मग रसाच्या अपेक्षेने पाहिले जाते. हा रस अलौकिक असल्यामुळे ज्यामुळे लौकिकाचे भान जागृत होईल ते रसविघ्न टाळण्याचा आदेश देले क्रमप्राप्त होते, असा आदेश काव्यशास्त्रात अभिनव गुप्तांनी दिलेलाच आहे. लौकिक जीवनाचे चित्रण लौकिकाचे भान करून देणारच. ते जीवनच साहित्यातून टाळावे अशी वृत्ती ह्यामुळे निर्माण होते. रसचर्चेत असणारा अलौकिकवादाचा धागा प्राचीन साहित्याची फार मोठी मर्यादा ठरलेला आहे. किंवा आपण असेही म्हणू की या मनोवृत्तीमुळे सारा वाड्मय प्रवाह आपले ताजेपण हरवून बसला. तीच वृत्ती अलौकिक वादाच्या रूपाने समीक्षेत प्रभावी होताना दिसते. काहीही म्हटलं, तरी सर्व सांस्कृतिक वारशाचे सामर्थ्य व मर्यादा ह्यावर प्रकाश टाकणारा हा सिद्धांत बारकाईने तपासणेच भाग आहे.
 दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा व शाश्वत महत्त्व असणारा सिद्धांत आहे. तत्त्वज्ञान, काव्यशास्त्र हे असे विषय आहेत की त्या क्षेत्रातील प्रश्नांची अंतिम व निर्णायक उत्तरे अजून कुणाला सापडली नाहीत.म्हणून


2