पान:रससूत्र (Rasasutra).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिष्ठाप्राप्त भूमिका बनलेली दिसत नाही. सामान्य अपेक्षा ही की, शंकुक नैय्यायिक असल्यामुळे त्याच्या भूमिकेची मांडणी अधिक तर्कशुद्ध व रेखीव असावी पण ही अपेक्षा पूर्ण होत नाही. तरीही अभिनवगुप्तांच्या भूमिकेवर शंकुकाची छाप, लोल्लटाच्या मानाने, अधिक दाट आहे.
 शंकुक हा नाट्यशास्त्राचा एक महत्वाचा भाष्यकार मानला जातो. रसविचाराशिवाय नाटयगृह, नाटयगृहपूजा, नांदी, करणे, इतिवृत्त, सामान्याभिनय, अशा अनेक प्रश्नांवर त्याची मते अभिनवगुप्तांनी उल्लेखिलेली आहेत. म्हणून त्याचे नाट्यशास्त्रावर भाष्य होते, ह्यात वाद नाही. हे भाष्य आता अनुपलब्ध आहे. शंकुकाने लोल्लटाचे खंडन केलेले आहे, त्यामुळे लोल्लटानंतर व त्याचे खंडन भट्टतोतांनी केले आहे, ह्यामुळे, तोतांपूर्वी तो होऊन गेला एवढेच निश्चित आहे. ह्याखेरीज इतर सर्व बाबी अनुमानाच्या आहेत. बहुमताने शंकुकाचा काळ इ. स. ८४० ते ८५० ह्यामध्ये कुठेतरी मानण्यात येतो. हा काळ एखाद्या दशकाने चुकण्याचा संभव आहे. म्हणजे शंकुक इ. स. ८२० ते ८३० ह्या दशकातील सुद्धा असण्याचा संभव आहे असे मला वाटते. सामान्यपणे शंकुक, आनंदवर्धनपूर्वकालीन मानला जातो. मला असेही वाटते की, ध्वनीचा अंतर्भाव अनुमानात करणारी जी परंपरा, आनंदवर्धनासमोर आहे, तिलाही शंकुक हा पूर्वकालीन असावा. कारण त्याच्यासमोर अजून नाटयशास्त्रातील 'अभिनय' शब्द जास्त महत्वाचा आहे. परंपरा शंकुकाला नैय्यायिक मानते. पण ज्या पद्धतीने तो अनुमानाचा विचार करतो ती पद्धत न्यायपरंपरेने मान्य केलेली पद्धत नाही. तो नैय्यायिक खरा, पण कोणत्या न्यायपरंपरेचा पाईक आहे हे सांगणे सोपे नाही.

 प्राचीन भारतात, बौद्धन्याय आणि वैदिकन्याय शतकानुशतके, एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणन उभे आहेत. डॉ. कान्तिश्चंद्र पांडे, शंकुकाला गौतमन्यायाचा म्हणजे वैदिक न्यायाचा अनुयायी समजतात. बहुमत हयाच बाजूला आहे. पण बहुमताचा हा कौल मान्य करणे कठीण आहे. लोचनानुसार, शंकुक चित्त प्रवाहधर्मी मानतो. ही भूमिका वैदिकन्यायाची नाही. वैदिकन्यायाच्या पाच पायऱ्या शंकुकाच्या विवेचनात दाखवून देणे कठीणच आहे. हया परंपरेनुसार नाटयप्रतीती हा भ्रमच आहे. नैय्यायिक भ्रमाचे स्पष्टीकरण अन्यथाख्यातीच्या भूमिकेवरून करतात. सादृश्य दोषामुळे ज्या वस्तूत जो धर्म नाही, तो तिथे प्रतीत होऊ लागतो, हे हयां ख्यातीचे स्थूलमानाने रूप आहे. शिंपल्यावर जेव्हा चांदीचा भ्रम होतो, तेव्हा नसलेली चांदीच प्रतीत होत असते. हाच प्रकार नाटयप्रतीतीत होतो. समोर नट असतो, राम नसतो. पण नटाच्या ठिकाणी रामाचे धर्म प्रतीत होऊ लागतात. असा आरंभ करून, वैदिकन्यायाला अनुसरून शंकुकाचे स्पष्टीकरण केले जाते. हया स्पष्टीकरणातील मुख्य अडचण ही आहे की, शंकुक नाटयप्रतीती भ्रम समजत नाही. तो अनुमानवादी नव्हे.


४४

.