पान:रससूत्र (Rasasutra).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 पण हाही लोल्लटाच्या उत्पत्तिवादाचा शेवट नव्हे. जगन्नाथ पंडिताने नव्यांचे मत म्हणून एका उत्पत्तिवादी भूमिकेचा उल्लेख केला आहे. ज्याअर्थी या भूमिकेला नव्य मत म्हटले आहे, त्याअर्थी १७ व्या शतकाच्या आरंभी केव्हातरी ही भूमिका निर्माण झालेली दिसते. माझे अनुमान असे आहे की, अलौकिकख्यातीचा स्वीकार करणाऱ्या मीमांसकांचे हे नव्यमत असावे. भरत नाट्यशास्त्राची संमती ह्या नव्यमताला असण्या- नसण्याचा प्रश्नच संभवत नाही. तर्कशास्त्रातील एक पेच वापरून ही भूमिका अभिनवगुप्तांची भूमिका त्याच्याच खंडनासाठी वापरत आहे. मीमांसकांच्यासाठी स्वस्वरूपाने आत्मा सुखदुःखादी जाणिवा नसणारा आहे. ह्या दर्शनाचा अभिमानी अभिनवगुप्तांच्या 'आनंदमय' आत्मरूपाचा विरोध करण्याचा प्रयत्न करणारच. या नव्यांचे मत असे आहे की, नाट्यप्रत्ययात निजत्वाचा निरास असतो. लौकिक व्यवहारात आत्म्यावर ज्याप्रमाणे निजमोहाचे आवरण असते, त्याप्रमाणे नाट्यप्रत्ययात निजत्व आच्छादिले जाते व प्रेक्षकांना आपणच दुष्यन्त आहो असे वाटू लागते. हे एकप्रकारे भ्रांतज्ञान, सदोष ज्ञानच म्हटले पाहिजे. ज्या दोषामुळे आत्मभाव आच्छा. दिला जातो व दुष्यन्तभाव दृढ होतो, त्या दोषाला हे विवेचक ' भावनाविशेष' असे म्हणतात. या शब्दप्रयोगामुळेच ही मंडळी मीमांसक असावीत असे अनुमान केले आहे.
 या नव्यमताची काही वैशिष्टये आहेत. अनुकार्यगत, प्रकृतीगत रस आहे. हे मत येथे स्वीकारलेले आहे. हा रस प्रेक्षकगत होतो हेही स्वीकारलेले आहे. म्हणून जे, रस रसिकगत मानतात व जे प्रकृतीगत मानतात, त्या दोघांनाही या मताचा विरोध करता येणार नाही. भावनाविशेष नावाच्या दोषाच्या रूपाने तादात्म्य आहे. आत्मरूप आच्छादिले जात असल्यामुळे निजत्वभावाचा निरास आहे. निजत्वभावाच्या निरासामुळे रसप्रत्यय अलौकिक आहे. दुष्यन्ताच्या ठिकाणी रसाची उत्पत्ती आहे; त्याचप्रमाणे प्रेक्षकाच्या ठिकाणीसुद्धा उत्पत्ती आहे. रसास्वाद संपला की भावनादोष समाप्त होतो, म्हणून रसही संपतो. तेव्हा ही प्रतीती फक्त आस्वादकापुरती मर्यादित आहे. जर वास्तविक कारणाशिवाय भावजागृती कशी होते, असा आक्षेप घेतला तर हे विवेचक म्हणणार कारणाशिवाय होणा-या उत्पत्तीमुळेच आम्ही ह्या प्रत्ययाला अलौकिक मानतो. रज्जूवर सर्पाचा भास झाला म्हणजे ते भ्रामकज्ञान भीती निर्माण करतेच. तसा हा भावनादोष आहे. निजत्वाचा निरास झाल्यानंतर भावजागृती कशी होणार? हा आक्षेप घेता येत नाही. कारण अभिनवगुप्तांच्या भूमिकेतूनसुद्धा निजत्वनिरास व भावजागृती एककालिक आहे. तरीही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे प्रेक्षकांना आनंद कसा होईल? ह्याचे उत्तर वाटल्यास अलौकिक ,प्रत्यय असल्यामुळे आनंद होतो असे द्यावे. वाटल्यास सर्व रसांत आनंद होत नाही, असे द्यावे. त्या भूमिकेत दोन्ही उत्तरे संभवतात. ह्या भूमिकेत उत्पत्तिवाद आहे, त्याचप्रमाणे पारमार्थिक अनुभवापेक्षा नाटयानुभव पृथक ठेवणेही आहे. कुणी असा प्रश्न


42