पान:रससूत्र (Rasasutra).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विभाव अनिष्ट आहेत हे तिथे (नाट्यदर्पणात.) गृहीत आहे. त्यांचे मते जे अनुकार्यगत म्हणून दुःखरूप आहे, त्याचे अनुकरण दुःखप्रतीती देणारे असणेच भाग आहे. नाही तर त्याला अनुकरण म्हणता येणार नाही. प्रश्न असा असतो की, जर करुणरस दुःखमय मानला तर प्रेक्षकांना त्याचा आस्वाद का ध्यावासा वाटतो? नाटयदर्पणकारांनी त्याचे कारण कवी व नट ह्यांचे कौशल्य असे दिले आहे. ह्याच मताचा अनुवाद पुढे मराठीत झालेला आहे.
  नाटयदर्पणकारांच्या मते, रस मुख्यतः अनुकार्यगत व प्रेक्षकगत आहे. काव्यात अनुसंधायक म्हणजे कवी व श्रोते ह्यांचा रसाला आश्रय असतो. पैकी अनुकरण करणाऱ्या नटांचे अनुभाव प्रेक्षकांच्यासाठी विभाव असतात व ते प्रेक्षकांच्या मनात स्थायीभाव उत्पन्न करतात. प्रेक्षकांचे अनुभाव रसाचे कार्य असतात. नाटयदर्पणकारांच्या ह्या भूमिकेत विविध विसंवाद आहेत. काव्यातील रस कविगत म्हणून एकदा मान्य केल्यानंतर रसांचा आश्रय विविध असतो- कवी काव्यगत प्रकृती म्हणजे अनुकार्य व प्रेक्षक- असे मत देणे अपरिहार्य असते. नाटकात प्रकृती असतात, म्हणूनच त्यांचा अनुकार्य म्हणून विचार संभवतो. काव्यात ह्या प्रकृती असतात, म्हणूनच त्यांचा अनुकार्य म्हणून विचार संभवतो. काव्यात ह्या प्रकृती अनुकार्य म्हणून नसल्या तरी प्रकृती म्हणून असतातच. नाटयशास्त्रातील तादात्म्याची कल्पना व सिद्धीच्या संदर्भात प्रेक्षकांचा विचार करण्याची प्रथा, ह्याची येथे विस्मृती आहे. तिचा परिणाम प्रेक्षकगत रसाचे विभाव म्हणून अनुभावांचा उल्लेख करण्यात झालेला आहे. जे नटदृष्टया अनुभाव आहेत, ते प्रेक्षकांच्यासाठी विभाव आहेत, असे स्पष्टीकरण देणे म्हणजे अनवस्था प्रसंगाला आमंत्रण असते. नटांचे अनुभाव, हे प्रेक्षकांच्यासाठी जर विभाव म्हणायचे, तर नटासाठी विभाव कोणते ? अनुकार्याचे अनुभाव, हे अनुकरणीय असले तरी ते विभाव ठरणार नाहीत. कवीसाठी पुनः विभाव कोणते ? विभावांची अनुभवांना देणे, एकतर सुसंगत नाही, दुसरे म्हणजे अनवस्थेकडे नेणारे आहे. लोल्लटाचे भरतानुसरण अथवा लोल्लटाचा रेखीवपणा नाट्यदर्पणात नाही असा ह्याचा अर्थ आहे. तरीही पण लोल्लटाचे ग्रंथरूपाने अवशिष्ट असणारे प्रमुख वारस म्हणून ह्या ग्रंथकारांचे महत्व मान्य केलेच पाहिजे.

 नाटयदर्पणात, काही ठिकाणी चमत्कारिक उणिवा आढळतात. उदाहरणार्थ, त्यांनी सात्त्विक भावांची गणना, अनुभावांच्या मध्ये केली आहेत, नाटयशास्त्रातच सात्त्विकभाव अनुभाव म्हणून उल्लेखिले गेले आहेत, हे खरे आहे पण ह्यामुळे भाव आणि अनुभाव ह्यातील फरक संपतो. पण अशा त्रुटींची यादी करण्यात अर्थ नाही. खरे महत्व नाट्यदर्पणातील मार्मिक सूचनांना द्यायला हवे. एक सूचना अशी आहे की, काही विभाव, उदाहरणार्थ, ललना सचेतन आहेत; काही भाव विभाव, उदाहरणार्थ


४०