पान:रससूत्र (Rasasutra).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे की, काव्यशास्त्रापुरते आम्ही इतरांचे अनुवाद करतो. कारण हा लकिक जगातील प्रपंच-संबंध प्रश्नांचा विचार आहे. जैन आचार्याना ही पद्धत फारच सोपी आहे. कारण त्यांचे दर्शनच एका मर्यादेत इतरांचे विचार ग्राह्य व समर्थनीय मानणारे आहे. वेदांतीसुद्वा आयुर्वेदाचा प्रश्न आला की, ह्या क्षेत्रापुरते सांख्यदर्शन प्रमाण मानतात. हा मार्ग अनुसरणारा ख्यातनाम जैन पंडित म्हणून आपण हेमचंद्रांकडे पाहू शकतो. काव्यशास्त्राच्या मर्यादेत अभिनवगुप्त (व म्हणून आनंदवर्धन व मम्मट) आणि राजशेखर हेमचंद्राला ग्राह्य वाटतात. पण सारेच जैन आचार्य ह्या मार्गाने जाणार नाहीत, आत्मा आनंदस्वरूप आहे, हा विचार नाकारून आपल्या दर्शनानुसार काही आचार्य असे मानणार की, मोक्ष सुखदुःख अभावरूप आहे. कारण आत्मा आनंदरूप नाही. ह्या भूमिकेवरून जे काही सुखदुःख जीवनात जाणवणार, ते आत्म्याला देहाविषयी निजत्वभावना असेपर्यंतच जाणवणार. म्हणून वाड्मयाचा जर काही भावगर्भ प्रत्यय असेल, तर तो लौकिक पातळीवरच शक्य आहे. ही भूमिका घेणारे आचार्य, लौकिकवादी,सुखदुःखवादी असणे अपरिहार्य आहे, म्हणून ते आपोआपच लोल्लटाचे वारसदार ठरतात. अभिनवगुप्त मम्मटानंतर उदयाला आले, तरी त्यांची भूमिका हीच राहणार. अनात्मवादी बौद्धांचे काव्यशास्त्रविवेचनसुद्धा असेच असणार. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेले नाटयदर्पणकार रामश्चंद्र-गुणचंद्र असे आहेत, ते हेमचंद्राचे साक्षात शिष्य असले तरी काव्यशास्त्रात हेमचंदाला अनुसरत नाहीत. स्वतःच्या दर्शनातील आत्म्याच्या कल्पनेला अनुसरतात. लोल्लटाचा पराभव अभिनवगुप्तांचे तर्कशास्त्र अगर वाड्मयीन भूमिकेचा मार्मिकपणा ह्यामुळे होत नाही. ह्या पराभवाचे कारण वेदान्त तत्त्वज्ञानाचा जीवनातील विजय हे आहे.
 नाट्यदर्पणकारांची भूमिका, ही मूलतः भट्ट-लोल्लटाची भूमिका आहे. पण तपशिलावर ह्या मंडळींनी थोडा थोडा फरक स्वीकारलेला आहे, नाट्यदर्पणकार पुष्टस्थायी म्हणजे रस, असे सांगून रससूत्र अनुकार्यगत आहे. हे स्पष्ट करतात. लोल्लटाचा ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे जो मुद्दा तिथे अनुमानाने समजून घ्यावा लागतो, तो नाट्यदर्पणात स्पष्टपणे आला आहे. हा मुद्दा म्हणजे रसाची सुखदुःखात्मकता. नाटयदर्पणाच्या मते, रस सुख आणि दुःख प्रत्यय देणारा असा उभयविध आहे. शृंगार, हास्य, वीर, अद्भुत आणि शांत हे पाच रस सुखप्रतीतीचेच आहेत. करूण, रौद्र, बीभत्स, भयानक हे चार रस दुःखप्रतीतीचे आहेत. हा फरक प्रामुख्याने विभवांच्यामुळे निर्माण होतो. शोक ही भावना दुःखद आहेच, पण ती अनिष्ट विभावांनी उत्पन्न होते. म्हणून त्यांच्या मते इष्टभाव सुखात्मक रस उत्पन्न करतात व अनिष्ट विभाव दुःखात्मक रस निर्माण करतात. नाट्यशास्त्रात अनिष्ट विभावाचा स्पष्ट उल्लेख बीभत्स रसाच्या संदर्भात आहे. उरलेल्या तीन रसांतील


39