पान:रससूत्र (Rasasutra).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अनुकार्यगत रस प्रेक्षकांच्यासाठी अनुकर्तृस्थानी आस्वादविषय होतो.
 लोल्लटाला बाधित पक्ष समजणे चुकीचे आहे . हे त्यावरून समजण्यास हरकतं नसावी. ललित वाड्मयाकडे, नाटकाकडे पाहाण्याचा कधीही बाधित न होणारा असा हा महत्त्वाचा दृष्टिकोण आहे. लोल्लटाचे हे महत्व मान्य करून, असा प्रश्न विचारला पाहिजे की, लोल्लट जे सांगतो ते नाट्यशास्त्राला संमत आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना काही बाबी स्पष्टपणे लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे, लोल्लट भावांना चित्तवृत्ती मानतो. नाटयशास्त्राने भाव चित्तवृत्ती आहेत असे कुठेही स्पष्टपणे म्हटलेले नाही. उलट पुष्कळ भाव असे आहेत की, ते चित्तवृत्ती नाहीत. दुसरी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, स्थायी पुष्ट होतो असे नाट्यशास्त्रात स्पष्टपणे म्हटलेले नाही. तिसरी बाब म्हणजे स्थायी वासनात्मक असतो असे लोल्लटाचे मत असणार नाही, असे मला वाटते. पण जर लोल्लटाचे मत गृहीत धरले, तर हे मत नाट्यशास्त्राला विरोधी आहे. चौथी बाब अशी की, लोल्लट सात्विक भावांची सोय कुठे लावणार हे स्पष्ट नाही. त्यांना भाव म्हटले तरी ते चित्तवृत्ती नाहीत. नाटयशास्त्रात ते अनुभव नाहीत. नाटयशास्त्रात नाट्य अनुकरणमय आहे असा उल्लेख आहे, पण हे विधान नाटक, काव्य, जे त्रैलोक्याचे अनुकरण करते. ह्या अनुकरणाला अनुलक्षून आहे. काव्याने त्रैलोक्याचे अनुकरण करणे व नटाने काव्यगत प्रकृतींचे अनुकरण करणे ह्या कल्पना भिन्न आहेत. सर्वात महत्त्वाची बाब ही की, प्रेक्षकांना नाट्यास्वाद प्रिय का असतो व निवेदकांना प्रेक्षकांनी नाट्यस्वाद घेणे महत्वाचे का वाटते, ह्या प्रश्नाची उत्तरे लोल्लटात नाहीत. लोल्लटाच्या भूमिकेनुसार विचार करताना, रसस्वाद सुखदुःखमय असा दुहेरी मानावा लागतो. प्रेक्षक जाणून बुजून दुःखाकडे का जातात ? या प्रश्नाचे उत्तर लोल्लट काय देणार ? नाट्यशास्त्रात ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी रंजन व शोभेच्या स्वतंत्र कल्पना आहेत. त्या लोल्लटाने स्वीकारल्या होत्या की नाही, हे आज सांगता येणार नाही.
 आज आपणासमोर प्राचीन परंपरेचे जे रसविषयक विवेचन उपलब्ध आहे, ते प्रायः वैदिक परंपरेचे आहे. अवैदिक परंपरा, विशेषतः जैन, बौद्ध हे, काव्यविवेचन कोणत्या पद्धतीने करीत, ह्याच्या फक्त खाणाखुणाच आज शिल्लक आहेत. पाटलीपुत्र, कनोज, तक्षशीला, नालंदा, अनहिलपट्टण येथे काव्य-नाट्यविचार जैन बौद्धांनी कसा विकसित केला, हे तपशिलाने सांगणे आज तरी शक्य नाही. आत्मा आनंदमय आहे. ही कल्पना वेदांताची आहे. त्यामुळे आनंद स्व-रूप असतो, दुःखाला मात्र कारण असते. जो दर्शने ही भूमिका स्वीकारीत नाहीत, त्यांनी रसाचा विचार कसा करावा? कधीतरी हा प्रश्न जैन आचार्याच्या समोर उभा राहिलेला आहे. भारतीय परंपरेनुसार ह्या प्रश्नाचे उत्तर जैन आचार्य दोन भिन्न पद्धतींनी देत असणार. कारण त्यांच्यातही काव्य, नाटके, व्याकरण, कोश आदींच्या परंपरा आहेत. एक पद्धत असे सांगण्याचा


३८