पान:रससूत्र (Rasasutra).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लोल्लटाला पूर्वमीमांसक का मानतात ? कुणाच्या तरी हे लक्षात आले की, उद्भट नाटयप्रत्यय भ्रम मानतो. भट्टनायक, अभिनवगुप्त नाटयंप्रत्यय अलौकिक मानतात. आमच्या दर्शनात प्रतीती ही यथार्थ अलौकिक अगर भ्रम असते, ज्याअर्थी लोल्लट अलौकिकतावादी नाही व नाटयात यथार्थ ज्ञान शक्य नाही, त्याअर्थी त्याला हा नाटयप्रत्यय भ्रम मानणे भाग आहे. पण तो भ्रमाला भ्रम न मानता यथार्थाप्रमाणे उत्पत्तीचा विचार करतो त्याअर्थी लोल्लट भ्रमाला यथार्थ समजणान्यापैकी असला पाहिजे. मीमांसकांनी भ्रमाचा विचार अनेक प्रकारे केला आहे. तो आख्यातिवादाचा विचार म्हणून प्रसिद्ध आहे. कुमारिलभट्ट, प्रभाकर ह्यांच्यात थोडाथोडा फरक आहे. पण सर्व मीमांसकांचे मुख्य मुद्द्यावर एकमत आहे. ते म्हणतात पुढे होणाऱ्या ज्ञानामुळे आधीचे ज्ञान बाधित होते हा वेळोवेळी घडणारा प्रकार आहे. पण नंतर बाधित होते ह्यामुळे (आधीचे) ज्ञान खोटे ठरत नाही. ज्ञान सत्यच मानले पाहिजे म्हणून भ्रमाचा भ्रमही सत्यच असतो. भ्रमाला यथार्थ प्रतीतीची जागा देणारे पूर्वमीमांसक आहेत, म्हणून लोल्लट पूर्वमीमांसक आहे, असा हा आडाखे बांधण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारचे चिंतन प्रथम कुणाला करावेसे वाटले, हे समजण्यास मार्ग नाही. पण काव्यप्रकाशच्या व्याख्याकारांनी ह्या मताचे अनुसरण केले आहे.
 ह्यांपकी एक बाब खरी आहे. नाटय अनुकरणरूप असल्यामुळे तिथे मूळ वतू नाही, म्हणून यथार्थ-ज्ञान नाही. नाटयप्रत्यय हा यथार्थ-ज्ञानाचा प्रमाण प्रत्यय नव्हे. नाटयप्रत्यय, उद्भटाने भ्रम मानला तरी तो नाट्यशास्त्राने भ्रम मानलेला नाही. इतर कुणीही तो भ्रम मानलेला नाही. कारण भ्रमाचा उदय, परिस्थितीतील अगर प्रभात्याच्या ठिकाणी असणाऱ्या दोपात होतो व सत्य कळले म्हणजे भ्रम दर होतो. प्रेक्षकांना प्रयोगापूर्वी कोणती नटी सीता होणार ह्याचे ज्ञान असते. प्रयोगानंतर तो नटीचे कामाबद्दल कौतुक करतो व ह्या कौतुकापोटीच नवा प्रयोग पाहण्यास येतो. नाटयप्रत्यय हा सत्याने बाधित होणारा प्रत्यय नव्हे. मग लोल्लट हा प्रत्यय कोणत्या प्रकारचा मानत होता ? प्रसिद्ध नैय्यायिक, जयंतभट्ट असे नोंदवतो की काही मीमांसक अलौकिकख्यातीचा स्वीकार करतात. त्यांच्या मते, लौकिक रजत व्यवहारप्रवर्तक असते. भ्रमाचे व भासाचे कारण अलौकिक रजत असते. त्याचा प्रत्यय सत्य असला तरी व्यवहारप्रवर्तक नसतो. लोल्लटाची ही भूमिका आहे. असे मला म्हणावयाचे नाही कारण लोल्लट दर्शनभूमिकेत पूर्वमीमांसक होताच असे आपण सांगू शकत नाही. मला इतकेच म्हणायचे आहे की, पूर्वमीमांसेत अलौकिकवादी भूमिका वर्ज्य नाही. मला वाटते, अनुकरण आणि भ्रम ह्यांत लोल्लटाने फरक मानला आहे. त्याच्या मते अनुकरणाचा विचार सत्य, असत्य, भ्रम, अलौकिक यापेक्षा निराळा करणे भाग होते. अनुकरणाचा आधार, सादृश्याचा भास निर्माण करणे हा असतो. आपण चामड्याला अगर पुठ्याला बेगड चिटकवून मुकुट तयार करतो. हा अनुकरणरूप मुकुट खरा


३६