Jump to content

पान:रससूत्र (Rasasutra).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



निश्चित नव्हे. कारण ती अनुकरण करीत आहे. समरस होऊन, अभिनय करताना तिला शोक प्रतीती येईल, रसस्वादही मिळेल; पण हा शोक तिचा नव्हे. हा सर्वमान्य मुद्दा आहे. हा शोक कुणाचा ह्या प्रश्नाची चार उत्तरे आहेत. पहिले उत्तर हे की हा शोक देशकालनिवद्ध लौकिक व्यक्तीचा आहे. काल्पनिक पात्राच्या बाबतीत हे उत्तर चूक ठरते. भूतकालातील प्रख्यात व्यक्तीही कुणी पाहिलेल्या नाहीत, त्या परिचित नाहीत. त्यांच्या बाबतीतही हे उत्तर चूक ठरते. दुमरे उत्तर हे की, हा कवीचा शोक आहे. मुनी वाल्मीकीचा शोक काव्यरूप झाला असे म्हणताना आपण ह्या उत्तराचा आधार घेत असतो. कवी आत्माविष्कार करतात ह्या भूमिकेतही हे उत्तर गृहीत आहे. तिसरे उत्तर, हा रसिकांचा शोक आहे, हे आहे. रसिक कवीशी समरस झालेला असतो कवी व रसिकांचा हृदयसंवाद असतो, असे सांगून आपण हे म्हणतो की कवीचा शोकच रसिकाच्या हृदयात संक्रांत होतो. कारण मूळ अनुभव कवीचा असतो. म्हणजे दुसरे व तिसरे उत्तर परस्पर निगडीत असून तिसरे उत्तरही दुसऱ्या उत्तराचीच एक आवृत्ती आहे. ध्वनिवादी ह्या भमिकेचे पुरस्कर्ते आहेत. ह्या उत्तरातील दुबळी जागा संस्कृत काव्यशास्त्राने विचारात घेतलेली नाही. कारण काव्यात फक्त राम व सीता नसतात, रावणही असतो, शूर्पणखाही असते. त्यांनाही राग, लोभ, क्रोध, आनंद असतात. ह्या भावना कुणाच्या ? वेणीसंहारात बीभत्स रसाचा प्रसंग आहे ( अंक ३ प्रवेशक) ह्या प्रसंगात प्रकृतीच्या ठिकाणी आनंद, तृप्ती व समाधान दाखविलेले आहे हा तृप्ततेचा भाव कुणाचा? ह्या भाव-भावना कवीच्या अगर रसिकांच्या नव्हेत. म्हणून चौथे उत्तर असे आहे की, कवी लौकिक जगताचा अनुभव घेतच असतो. तो निरनिराळी माणसे त्यांच्या त्यांच्या भूमिकेतून व स्वतःच्या भूमिकेतून पाहात असतो. स्वतःच्या जीवनात निजत्वाने भावोत्पत्ती न होता सुद्धा कवी आणि रसिकांना इतरांच्या भावनांशी तादात्म्य पावता येणे शक्य आहे. ह्या गृहीतावरच वाङ्मयाचा आस्वाद आधारीत आहे. ह्यासाठीच काव्यातील व्यक्तींचे एक निराळे जग मानावे लागते. काव्यातील भावना ह्या काव्यजगातील प्रकृतींच्या भावना असतात. लोल्लटाने हे चौथे उत्तर गृहीत धरले आहे. कारण नाट्यशास्त्रात प्रकृती आहेत, नटाने त्यांची भूमी होणे व त्यांचा अभिनय करणे आहे. लोल्लट ज्यावेळी नाट्यात भावोत्पत्ती असते असे म्हणतो, त्यावेळी त्याला म्हणायचे आहे ते हे की काव्यगत प्रकृती सीता, हिच्या ठिकाणी शोकाची उत्पत्ती होते. लोल्लटाने जे काव्यगत प्रकृतीविषयी म्हटले आहे ते प्रयोगगत नटाविषयी आहे, अशी समजूत झाली म्हणजे विपर्यास होतो. ह्या विपर्यासाचा आधार काव्यातील भावना, प्रथम कवीच्या व नंतर रसिकांच्या समजणे हा आहे. सत्य इतकेच आहे की, लोल्लटाने नाट्यशास्त्रातील प्रकृती व भूमी हा विभाजन-विचार मान्य करून मूल ग्रंथाचे अनुकरण केले. क्रमाने भट्टनायकापासून पुढे ह्या मुद्दयांचे रहस्य दुर्लक्षित झाले. ह्या विपर्यासांच्यापैकीच एक विपर्यास त्याला पूर्वमीमांसक समजणे हा आहे.


३५