Jump to content

पान:रससूत्र (Rasasutra).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असेच वाटणार. फार तर राम हसतो सीता रडते असे वाटणार. वरवर पाहता ते खरेही आहे. स्थूल दृष्टीने, वाङ्मय विचार करणा-यांचा प्रतिनिधी लोल्लट आहे. पण वस्तुस्थिती ही आधुनिक विवेचकांच्या इच्छेपेक्षा निराळी आहे. रसविचाराचा आरंभ लोल्लट नसून त्यामागे किमान हजार वर्षांची परंपरा आहे. भामह व दंडी, महाकाव्यात असणारी नद्या, पर्वत, वनश्रींची वर्णने गुणस्वरूप व काव्यसमृद्धीचा भाग मानणारे आहेत. दंडीला यमकादी शब्दालंकार व चित्रबंध महत्त्वाचे वाटतात. हेमचंद्राने लोल्लटाची जी मते उद्धुत केली आहेत, त्यावरून असे दिसते की, रसाच्या विरोधी असणाऱ्या सर्व चमत्कारांना, लोल्लट हिणकस मानतो. त्याला कवींनी अकारण आपल्या वर्णन-सामर्थ्याचे प्रदर्शन करीत बसणे उचित वाटत नव्हते. ही मते प्राथमिक विचार करणाऱ्याची नव्हेत. प्राथमिक भूमिका असेलच, तर ती नाटयशास्त्राच्या पूर्वी केव्हातरी अवतीर्ण होऊन मावळली आहे. लोल्लट, नटाच्या ठिकाणी रसभाव नसतात असे सांगणाऱ्या उद्भटाच्या मताचे खंडन करून आपल्या मताची स्थापना करीत आहे. तो म्हणतो, अनुसंधानवल नटाच्या जवळ असते. ह्या अनुसंधानात लय आदींचे अनुसरण अंतर्भूत असल्यामुळे लयभंग होत नाही. लोलटाच्या ह्या मुद्दयाचा आशय असा आहे की, नट जे अनुकरण करतो त्या अनुकरणात योजना असते. ताल, लय, वृत्ती, संवाद, नाटयधर्मी ह्या योजनेचा भाग असतात. लय सांभाळूनच अनुकरण असल्यामुळे लयभंग होत नाही. अनुकरण, नाटयधर्मीसह असल्यामुळे नट मरतही नाही. नटाच्या ठिकाणी वासनावेशामुळे रसभाव असतात. हा मुद्दा नटाच्या ठिकाणी भावोत्पत्ती सांगणारा नसून, नट अभ्यासबलाने प्रकृतीशी तादात्म्य पावतो; मनाने त्यांच्याशी एकरूप होतो; म्हणून नटाला गौणपणे रसास्वाद असतो, असे सांगणारा आहे.
 प्रश्न हा आहे की, नटाची जागा नाटयप्रयोगात कोणती समजावयाची? नट प्रकृतीचा अभिनय करतो, त्यावेळी प्रकृतीशी काही मर्यादेत एकरूप होतो की नाही ? नाटयशास्त्राच्या मते ही एकरूपता, जीवात्म्याने स्वदेह सोडून परदेह, पराभव स्वीकारावा, ह्या जातीची असते. ह्यावेळी नट प्रकृतीचे भाव माझेच आहेत हे मनाने स्मरत असतो (३५ । २६-२७ ) ह्या परभावस्वीकाराशिवाय सात्विक भावाचा अभिनयसुद्धा काही वेळा अशक्य होतो. हा भावस्वीकार लोल्लटमते खरा आहे, म्हणूनच नटाला रसयोग आहे. पण हा भावस्वीकार योजनापूर्वक आहे; त्याला मर्यादा आहे, म्हणून लयभंग नाही. हा मुद्दा भावोत्पत्तीचा म्हटले तर आहे; म्हटले तर नाही. कारण तो भावप्रतीतीचा आहे. ह्या भावप्रतीतीच्या स्वीकाराशिवाय कुणाचीही सुटका नाही; अभिनवगुप्तांचीही नाही.
 विपर्यासाचे तिसरे कारण कला-व्यवहारातील भावनांच्या आश्रयाबाबतच्या संदिग्धतेत आहे. अशोकवनातील सीता शोक करीत आहे. हा शोक कुणाचा? नटीचा


३४