पान:रससूत्र (Rasasutra).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तर द्यावे लागेल. तो प्रश्न असा आहे की तो " नाट्यरस" ह्या शब्दाचे स्पष्टीकरण कसे करतो. लोचनाच्या आधारे विचार करायचा तर त्याच्या मते नाट्यात प्रयोजित केले जातात म्हणून तो त्यांना नाट्यरस म्हणतो. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर तो नाट्य म्हणजेच रस असे मानीत नाही. रस नाट्यातच असतात असे म्हणतात असे म्हणत नाही. रस नाट्यप्रयोगात प्रयोजित होतात याचा अर्थ असा आहे की रस काव्यात असतात. अधिक स्पष्ट म्हणायचे तर रस काव्य-गत प्रकृतीच्या ठिकाणी असतात. ही काव्यगत प्रकृती लोल्लटाचे अनुकार्य आहे. रस मुख्य वृत्तीने अनुकार्यगत असतो. हे हेमचंद्राचे स्पष्टीकरण आहे. अभिनव भारतीत मुख्य वृत्तीचा उल्लेख नसला तरी अनुकार्य व अनुकर्ता ह्या विभागणीत ही भूमिका गृहीत आहे. कारण अनुकार्याच्या ठिकाणी रस स्वतःसिद्ध आहे. अनेकांच्या ठिकाणी तो अनुसंधानबलाने आहे. अनुकार्य कुणाला समजावे हा एक विवाद्य प्रश्न आहे. आपणांसमोर अनेक राम उभे आहेत. (१) अयोध्येत जन्माला आलेली दशरथाचा पुत्र असणारी दैवी व्यक्ती हा पहिल्या गटातला एकमेव राम आहे.(२) देशकाल निबद्ध असणाऱ्या ह्या व्यक्तीची कथा अनेक पुराणांच्या मधून येते. आपली परंपरा ह्या पुराणांना इतिहास मानते. हा रामकथेचा इतिहास रामायण, महाभारत, भागवत यांत तर येतोच पण अनेक पुराणे, आख्याने, उपाख्याने या गटांत येणारे अनेक ग्रंथांतील अनेक राम आहेत. (३) या इतिहासावर आधारलेली अनेक काव्य व नाटके यांत येणारी राम या प्रकृतीची अनेक वाड्‍मयीन रूपे ( ४ ) नाट्यप्रयोगात उभे असणारे रामाचे काम करणारे अनेक नट हा एकेक राम. आपणासमोर उभ्या असणा-या शेकडो रामांची ही वर्गवारी आहे. यांपैकी अनुकर्ता नट आहे यावर सर्वांचे एकमत आहे. वाद आहे तो अनुकार्याबाबत.
  कित्येकदा अनुकार्य म्हणून लौकिक व्यक्ती गृहीत धरली जाते. सर्वप्रथम अनुकार्याचा हा अर्थ लावण्याचा मान उपलब्ध पुराव्यात भट्ट तोतांचा आहे. त्या आधी कणी हे मत दिले असल्यास आपल्याला माहीत नाही. अभिनवगुप्तांनी आपल्यापुरता स्पष्टपणे हा उल्लेख केला आहे की नटव्यापार काव्यपुरस्सर असतो (६।३८ वरील टीका) त्यांनी जे स्पष्ट केलेले नाही ते हे आहे की लोल्लटही नटव्यापार काव्यपुरस्सरच मानता. त्याबाबातीत, पहिली महत्त्वाची गोष्ट असेल तर ती ही की नाट्यप्रयोगात नटाला फक्त नाटक काव्यातील प्रकृतींचे अनुकरणच शक्य असते. लौकिक व्यक्ती असणारा राम कसा वागला हे कुणालाच माहीत नसते. नटालाही ते ज्ञात असणार नाही. इतिहास पुराणातील राम तर सोडाच पण एका नाटकात काम करणाऱ्या नटाला दुसऱ्या नाटकातील रामाचे अनुकरण शक्य नाही. भासाच्या नाटकातील वाक्ये भवभूतीच्या नाटकात वापरता येणार नाहीत. दुसऱ्याच्या नाटकातील भाग आपल्या नाटकात घेणं, आपल्या नाटकातील पाठ्य विसरणे, गाळणे हे सारे सिद्धीचे


३०