पान:रससूत्र (Rasasutra).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



स्थायीभाव ओसरत जातो. व जे पुष्ट होते त्याचे नाव रस व्यवस्थेत 'नाही. नवा रस मानूनही ते देता येत नाही. आजच्या वाडयाच्या संदर्भात. रसव्यवस्था असमाधानकारक ठरू लागते. तिच्या मर्यादा दिसू लागतात. वाड्मयाच्या ज्या रूपाचे आकलन करण्यासाठी रसव्यवस्था अपुरी पडेल, त्या रूपाची एक जाणीव शंकुकाने कैक शतके आधीच नोंदविलेली आहे.
 शंकुक स्वतः चित्त प्रवाहधर्मी मानतो. त्यामुळे भाव निर्माण व्हावेत, स्थिर व्हावेत पुष्ट व्हावेत ही कल्पना त्याला पटणे शक्य नाही. शंकुकाचे आक्षेप आपणाला फारशी नवी माहिती देत नाहीत. लोल्लट पुष्टिवादी आहे हे गृहीत धरून हे आक्षेप येतात. स्थायी भाव व व्यभिचारी, भाव जर सहभावी नाहीत तर मग व्यभिचारी भाव स्थायीची पुष्टी कशी करू शकतील हा आक्षेप शंकुकाने घेतलेला नाही. शंकुकाचे जे आक्षेप लोल्लटाला नाटयशास्त्राची संमती नाही त्या दिशेने येतात ते फारसे प्रस्तुत नाहीत. स्वतंत्रपणे एक भूमिका म्हणून लोल्लटाचे मत समजून घेण्याची व खोडण्याची गरज शंकुकालाही वाटलेली दिसत नाही. इतर कुणी तसा प्रयत्न करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण लोल्लटाच्या कपाळी एक बाधित पक्ष हा शिक्का बसलेला होता. लोल्लटाचे मत मागे पडले ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्याचे कारण शंकुककृत खंडन हे दिसत नाही.
 आज आपण लोल्लटाची भमिका समजावून घेऊ लागलो की अनेक अडचणी निर्माण होतात. त्यांची उत्तरे सापडत नाहीत ज्याप्रमाणे स्थायीभाव विभावांनी उत्पन्न होणारे आहेत त्याचप्रमाणे व्यभिचारी-भाव देखील विभावानीच उत्पन्न होणारे आहेत. मग फक्त स्थायीच्या उत्पत्तीचे कारण म्हणून विभाव का सांगावयाचे ? अनुभाव हे नेहमी भावजन्य असणार. जे भावाच्यामधूनच सहजतः जन्मतात ते पुनः भावांच्या पुष्टीचे कारण कसे होणार? भावांच्या पुष्टीत व्यभिचारी भाव सहभागी होतात तसे विभावही सहभागी होत असणार. जे विभाव स्थायीच्या उत्पत्तीचे कारण ते पुष्टीचेही कारण आहेत असे म्हटल्यानंतर जे पुष्टीचे कारण असणारे व्यभिचारी भाव आहेत, ते उत्पत्तीचेही कारण का म्हणू नयेत ? असे एक ना दोन, अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांचे उत्तर ही भूमिका स्वीकारणारे कोणते देते असतील कोण जाणे! सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे की, रस मुख्यवृत्तीने ज्या अनुकार्यात उपस्थित आहे असे लोल्लट म्हणणार ते अनुकार्य जर विभावच असेल तर मग विभावाचे स्थान या भूमिकेत तिहेरी समजावे लागेल. विभाव स्थायी उत्पन्न करतात. विभावस्थायी पुष्ट करतात. विभावच रस धारण करतात. हे खरेच त्याला अभिप्रेत आहे का ? रसाच्या बाबतीत मुख्य वृत्तीने आणि गौण वृत्तीने ही विभागणी योग्य आहे का ? एकाएकी असे वाटू लागते की आपणास लोल्लटाचा गाभा अजून सापडत नाही.
  लोल्लटाचे म्हणणे नीटपणे समजून घ्यायचे असेल तर आपणास प्रथम एका प्रश्नाचे


२९ .