पान:रससूत्र (Rasasutra).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला." अभिनवगुप्ताच्या ह्या विधानामुळे. लोल्लट तत्त्वतः जितके भाव तितके रस मानतो व भावांची संख्या निश्चित नसल्यामुळे अनंत रस मानतो असे मत अनेक विद्वानांनी करून घेतलेले आहे. पार्षद प्रसिद्धी म्हणजे परिषदेतील लोकांची मान्यता व परंपरा फक्त आठ रसांनाच आहे. म्हणून लोल्लटाने आठ ही रससंख्या निश्चित केली आहे. हा याच मताचा उत्तरार्ध आहे. डॉ. व्ही. राघवन यांच्यासारख्या मर्मज्ञाचेही मत असेच आहे. मला स्वतःला ही भूमिका मान्य नाही. सगळे भावच आहेत. प्रसंगा . नुसार स्थायीभावसुद्धा व्यभिचारी भाव होतात ही भूमिका नाटयशास्त्रातच आहे. जरा स्थायी आणि व्यभिचारी हे भावच असतील तर मग या दोहोंच्यामध्ये भेद कसा करणार ? नाट्यशास्त्राच्या मते, रस व त्यांची नावे आचारसिद्ध व आप्तोपदेशसिद्ध आहेत. प्राचीनांच्या विचारात आप्ताच्या प्रामाण्याला फार मोठे महत्त्व असे. नाट्यशास्त्रातील आप्त कोण? ज्यांच्यासमोर नाटयप्रयोग करून दाखविला जातो ते प्रेक्षक, सिद्ध लेखक आणि प्राश्निक हे या क्षेत्रातील आप्त आहेत. हेच परिषदेत बसणारे पार्षद आहेत. ह्या आप्तांचा उपदेश आणि नाटककार, नाटय-प्रयोगकार यांचा आचार ह्या नाटयशास्त्राच्या मते रस, त्यांची संख्या व नावे यांचा आधार आहे. लोल्ल्ट ज्यावेळी पार्षद प्रसिद्धीमुळे रस संख्या ठरते असे सांगतो त्यावेळी, तो फक्त त्या क्षेत्रातील आप्त स्पष्ट करीत आहे व नाटयशास्त्राला अनुसरत आहे. म्हणून वस्तुस्थिती अशी दिसते की, लोल्लट रस-संख्या मर्यादित व ठरावीक मानतो. उद्भटापासून नाटयशास्त्रात शांतरस आहे. जर लोल्लट हा भाग मूळ ग्रंथातील समजत असेल तर तो रस (शांतरसासह) नऊ मानतो. जर हा भाग त्यांच्या मते प्रक्षेप असेल तर तो रस आठ मानतो. आप्तोपदेशामुळे रससंख्या निश्चित ठरते ह्या भूमिकेत तत्वतः रस अनंत आहेत- याला मान्यता असते रसाच्या अनुरोधाने काही भाव स्थायी ठरतात. जोपर्यंत स्थायीभाव आणि व्यभिचारी भाव यात सीमारेषा टाकण्याचा दुसरा कोणता आधार उपलब्ध नाही, तोपर्यंत आप्तोपदेशानुसार रस, रसानुसार स्थायीभाव, इतर भाव संचारी अशी विभागणी अपरिहार्य असते. नाटयशास्त्रातच ही भूमिका आहे. लोल्लट ती अनुसरत आहे.
 नाटयशास्त्र एकूण भावांची संख्या ४९ सांगते. ह्या यादीत नवी भरही घालते. लोल्लट तत्वतः भाव अनंत मानत असला व सर्वभाव रस होऊ शकतात म्हणून तत्वतः रस अनंत मानत असला, तरी या विचाराला लोल्लटाचे योगदान फक्त एका तार्किक क्रमात नाटयशास्त्राचा मुद्दा मांडून दाखविणे इतकेच आहे. येथे विचार नवा नसून फक्त भाषा नवी आहे.
 सारेच भाव तत्त्वतः रस होऊ शकतात असे म्हटल्यावर तत्त्वतः प्रत्येक भाव स्थायी होऊ शकतो हे मान्य करणेच भाग आहे. म्हणजे सर्वच भाव वासनात्मक असू शकतात असे म्हटले पाहिजे. नाटयशास्त्रातच स्थायी व्यभिचारी होऊ शकतो. ही भूमिका


22