पान:रससूत्र (Rasasutra).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यासाठीही गमक, अनुभाव आवश्यक आहेत. लोल्लट नाट्यशास्त्रातील बारीक-बारीक बाबी, आपल्या विवेचनात कशा स्वीकारतो हे पाहण्याचे एक स्थळ आहे.
 लोल्लटाच्या विवेचनात घोटाळ्यात टाकणारे यानंतरचे स्थळ म्हणजे त्याची " न सहभाविनः" ही कल्पना. व्यभिचारी भाव हे स्थायी भावाचे सहभागी नाहीत. हे दोन भाव एकमेकांचे सहभावी नसण्याचे कारण काय? पुढच्या टीकाकारांचे असे स्पष्टीकरण आहे की लोल्लटाने ह्या ठिकाणी न्यायाची भूमिका स्वीकारलेली दिसते. न्यायसूत्र १।१।१६ नुसार एकावेळी दोन चित्तवृत्ती सहभावी रूपाने एका मनात अस्तित्वात येऊ शकत नाहीत. मनाचा विचार योगशास्त्रानुसार करण्याची भारतीयांची सर्वसामान्य पद्धत आहे. फक्त नैय्यायिकच त्या दर्शनाचे आग्रही अभिमानी असल्यामुळे चित्तवृत्तीची कल्पना न्यायसूत्रातून स्वीकारतील. इतर दर्शनाचे अभिमानी किंवा कोणत्याच दर्शनाचा आग्रह नसणारे मनाचा विचार करण्यासाठी गौतमाच्या न्यायसूत्राकडे वळण्याचा संभव कमी आहे संस्कृतमधील सर्व काव्यसमीक्षकांना भिन्नभिन्न चित्तवृत्ती सहभागी असण्यात काहीच आक्षेपार्ह वाटलेले दिसत नाही. एकावेळी सरोवरातील पाण्यावर अनेक तरंग असल्याप्रमाणे त्यांना वाटले. कारणे कोणतीही असोत स्थायीभाव व व्यभिचारी भाव सहभावी नाहीत हे मत लोल्लटाच्या नावे नोंदविले गेले आहे. या निमित्ताने रससूत्रानंतरच्या दृष्टांताचा उल्लेख आला आहे व या दृष्टांतानुसार काही भाव वासनात्मक व काही उद्भूत अशी विभागणी करून स्थायी वासनात्मक असतात व व्यभिचारी उद्भूत असतात असे म्हटलेले आहे.
  लोल्लट नाट्यशास्त्रातील ज्या दृष्टांताचा उल्लेख करतो त्यात असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे नाना व्यंजन औषधी आणि द्रव्य याच्या संयोगाने वाडवादी-रस निर्माण होतात त्याप्रमाणे नाना भावांच्या योगाने उपगत असा स्थायी रसत्वाप्रत जातो. हा दृष्टांत जरी समोर ठेवला तरी त्यामुळे स्थायी व्यभिचारी सहभावी का नसावेत व स्थायी वासनात्मक का असावे याचा उलगडा होऊ शकत नाही. स्थायीभाव काय अगर व्यभिचारी भाव काय दोन्ही गट भावनांचे आहेत. नाट्यशास्त्रात दोघांनाही भाव म्हटले आहे. लोल्लट दोन्ही गटांतील भावांना चित्तवृत्ती मानतो. एक चित्तवृत्ती वासनात्मक आणि दुसरी उद्भूत का असावी? एका रसाचा स्थायीभाव इतर रसाच्या प्रसंगात व्यभिचारी होऊ शकतो, हे नाट्यशास्त्राचेही मत आहे: लोल्लटाचेही असेच मत आहे. लोल्लट असे मानतो की प्रसंगपरत्वे कोणताही भाव स्थायी होऊ शकतो. हे मत दिल्यानंतर पुन्हा स्थायी तेवढे वासनात्मक असतात असे कसे म्हणता येईल?
  लोल्लटाच्या ह्या भूमिकेचे थोडेसे स्पष्टीकरण केले पाहिजे. “ अभिनवगुप्त, रसांची संख्या इतकीच का ? हेच नवरस का मानावे ?" याचे स्पष्टीकरण करीत आहेत. या विवेचनाचा शेवट असा आहे- “ ह्यावरून रस अनंत आहेत. पार्षद प्रसिद्धीमुळे इतकेच रस प्रयोजित केले जातात.असे जे भट्ट लोल्लटाने सांगितले आहे त्याचा निरास


२१