पान:रससूत्र (Rasasutra).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेक्षकांचे अनुभाव हे रसजन्य असतात. ह्या स्पष्टीकरणाचे वैशिष्टय ह्यात आहे की, एका ठिकाणच्या रसाचे कारण विभाव आहेत. दुसऱ्या ठिकाणी रसाचे कारण अनुभाव आहेत. म्हणजे गरजेनुसार विभाव व अनुभाव ह्यांना रसकारण म्हणता येते. शिवाय अनुकार्यगत रसाचे अनुभाव हे कारण नाहीत हेही सांगता येते.' पुढे नाट्यदर्पणकारांनी असेही म्हटले आहे की नाट्यप्रयोगात असणारे नटगत विभाव, अनुभाव, व्यभिचारी हे सर्व मिळून रसिकांच्यासाठी विभाव होतात.
 नाटयदर्पणकारांनी फार चतुरपणे रस्ता शोधून काढला आहे. लोल्लटानुसार पुष्टस्थायी हा रस ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली असून लौकिक सुखदुःखवादाचाही पुरस्कार केला आहे आणि प्रेक्षकगत रसही त्यांनी आपल्या विवेचनात स्वीकारून दाखविला आहे. रसजन्य अनुभावाचा प्रश्न सोडविताना एकीकडे अनुभाव रसाचे जनक केले आहेत. दुसरीकडे ते रसजन्य ठरविले आहेत. पण ह्या सगळ्या मांडणीत प्रेक्षकगत भावोत्पत्तीला मान्यता देऊन त्यांनी नवे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्रेक्षकगत भावोत्पत्ती, मान्य केल्यानंतर कुणाच्याही भूमिकेनुसार रसास्वाद अशक्य होतो. जीवन आणि कला ह्या दोहोंतील फरक अनुकार्यगत रसोत्पत्तीमुळे पुसला जात नाही. तो प्रेक्षकगत भावोत्पत्तीमुळे पुसला जातो.
 प्रसिद्ध इटालियन संस्कृतज्ञ, नोली ह्यानी याठिकाणी वाक्यरचना थोडी निराळी स्वीकारली आहे. पुढच्या वाक्यातील एक शब्द त्यांनी मागे घेतला व मागच्या वाक्याचा शेवट ह्या शब्दावर केला. नोली ह्यांच्या सुधारणेमुळे अर्थ असा होतो, " ह्या ठिकाणी विवक्षित असणारे अनुभाव हे रसजन्य अनुभाव नाहीत. कारण त्या (रससूत्रातील) अनुभावांची गणना रसजन्य म्हणून करता येणार नाही. ते भावाचेच अनुभाव आहेत." नोलींच्या या सुधारणेमुळे अनुभाव चितवृत्तीच आहेत, असा होणारा अर्थ टळला. पण अनुभाव रसकारण आहेत की नाही हा प्रश्न मात्र तसाच शिल्लक राहिला आहे. रसजन्य अनुभाव आणि भावजन्य अनुभाव असा फरक नाट्यशास्त्रातच आलेला आहे. नाट्यशास्त्राच्या आठव्या अध्यायात रसदृष्टी स्थायीभावांच्या दृष्टी संचारी भावांच्या दृष्टी असे वर्णन आले आहे. सहाव्या अध्यायात प्रत्येक रसाच्या वर्णनात अनुभाव सांगितलेले आहेत. सातव्या अध्यायात भावांचे अनुभाव आलेले आहेत. लोल्लटाने अचूकपणे हे ओळखून रसांचे अनुभाव व भावांचे अनुभाव, असा भेद टाकला आहे व रससूत्रात उल्लेखिलेले अनुभाव हे भावाचे अनुभाव आहेत, असे स्पष्ट केले आहे. लोल्लटाला असे म्हणावयाचे आहे की विभाव, अनुभाव, व्यभिचारीभाव यांचा स्थायीशी संयोग होतो व स्थायी उपचित होतो. स्थायी उपचित झाल्यानंतर स्थायीची पुष्ट अवस्था दाखविणारे अनुभाव आहेत. त्यांचा उदय रस उत्पत्तीनंतर होतो. रससूत्र हे त्यापूर्वीचे म्हणजे भावांचे अनुभाव उल्लेखिते. अनुभावाचे काम भावगम्य करून देण्याचे आहे. रस हा उपचित अवस्थेतील भाव असल्यामुळे


२०