पहिला मुद्दा असा की खरेच हा चिरंतन पक्ष आहे का ? येथवरच्या विवेचनावरून हेपड स्पष्ट होण्यास हरकत नसावी की सगळेच जुने लोक लोल्लटाप्रमाणे विचार करीत नाहीत. मातृगुप्त, भामह, उद्भट्ट हे निश्चितपणे लोल्लटापेक्षा भिन्न पद्धतीने विचार करणारे आहेत. ह्याच क्रमात राहुल व कीर्तिधर असण्याचा संभव आहे. दंडी हा असा काव्यशास्त्रज्ञ आहे जो लोल्लटाला पूर्वगामी म्हणून पाहाता येईल. भामहाचा समकालीन म्हणून उद्भटाच्या भूमिकेलाही पूर्वगामी म्हणून पाहाता येईल. दुसरा मुद्दा असा की जर अभिनवगुप्त समजतात त्याप्रमाणे लोल्लटाचे मते हा चिरंतनपक्ष असेल; जर ते प्राचीन मत असेल, तर तो भरताचा दीर्घकाल संमत अभिप्रेतार्थ मानावा लागेल व आपण जो अर्थ लावीत आहोत, तो भरत मुनीला अभिप्रेत नसणारा अर्थ मानावा लागेल. तिसरा मुद्दा असा की शतकानुशतके मान्य असणारी एखादी वाड्मयीन भूमिका एकाएकी बाधित पक्ष म्हणून पाहाणे बरोबर आहे का? रसचर्चा करणारे अभ्यासक, निःशंकपणे लोल्लटाला चिरंतन पक्ष म्हणतात. व अभिनवगुप्ताच्या भूमिकेला भरतसंमत भूमिका म्हणतात. यात काही विसंवाद आहे असे त्यांना जाणवतच नाही. भट्ट लोल्लट, हा रससूत्राचा प्रमुख भाष्यकार आहे. ह्यात कुणाचेही दुमत नाही. एकदा अभिनवगुप्तांनी लोल्लटापासून आरंभ केल्यानंतर पुढे सर्वानी लोल्लटाला आपल्या विवेचनाचा आरंभ मानले आहे. सर्वानीच एक बाधित पक्ष म्हणून त्याचा विचार केला आहे. एकदा शंकुकाने त्याच्यावर जे आक्षेप घेतले त्यात नवीन आक्षेपांची भरसुद्धा कुणाला घालावीशी वाटली नाही. हया लोल्लटाचे दर्शन कोणते आहे ? उत्तरकालीन काव्यशास्त्रांच्या टीकाकारांनी अनेकदा दीर्घ अभिधा-वादी म्हणून त्याचा उल्लेख केलेला आढळतो. दीर्घ अभिधावादी, हे मीमांसक असून प्रभाकरांचे अनुयायी आहेत. ते अन्विताभिधानवादी असल्यामुळे त्यांच्या मते वाक्याचा सलग अर्थ वाचकांना कळतो. ह्या भूमिकेच्या अनुयायांना लक्षणा आणि तात्पर्य ह्या शब्दशक्ती मानाव्या लागत नाहीत. काव्यप्रकाशाचे आधुनिक टीकाकार झळकीकर लोल्लटाला कुमारिल भट्टाचा अनुयायी मीमांसक मानतात. झळकीकरांच्यामुळे ही भूमिका प्रसिद्ध ठरली आहे. अभिनव भारतीचे हिंदी भाषांतरकार आचार्य विश्वेश्वर त्याला उत्तर-मीमांसक म्हणजे वेदांती मानतात. हिंदीतील अजून एक अभ्यासक डॉ. तारकनाथ बाली लोलट उत्पत्तिवादी म्हणजे आरंभवादी आहे असे ठरवितात. भिन्न चित्तवृत्ती एकावेळी संभवत नाहीत. ह्या त्याच्या विधानाकडे बोट दाखवतात व ह्या दोन आधारांवर ते त्याला नैय्यायिक समजतात. डॉ. कांतिचंद्र पांडे यांच्या मताप्रमाणे तो शैव आहे.
खरे म्हणजे ह्यांपैकी एकाही मताला फारसा आधार नाही. लोल्लट शैव आहे हे ठरविण्यासाठी तो स्पंदकारिकेचा भाष्यकार आहे हे निर्विवादपणे ठरले पाहिजे. त्याच्या नाटय-विवेचनात शैव भूमिका नाही. तो उत्पत्तिवादी आहे. हे हया अर्थाने की
१४