पान:रससूत्र (Rasasutra).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रूप होतात. तो प्रकृतिगत असल्यामुळे तिथे चैतन्य भेद आहे. म्हणून रस आस्वाद्य आहे असे त्याचे म्हणणे दिसते. गांधारी ज्यावेळेला असे म्हणते की कृष्णा, करुण विलाप करणाऱ्या या माझ्या सुना पाहा. त्यावेळी उद्भट ह्या विलाप करणाऱ्या स्त्रियांच्या ठिकाणी करुण रस मानतो व तो स्वशब्द वाच्य आहे. भीमाने दुःशासनाची छाती फोडून रक्त प्राशन केले. ते रौद्र कर्म पाहन सारेजण भयभीत झाले असे वाक्य आले की त्या ठिकाणी उद्भट रौद्ररस मानतो. काव्यात अगर नाटकात ज्या प्रकृती आहेत त्यांच्या भावना म्हणजे रस ही रसाची प्रकृतिगत भूमिका घेतल्यानंतर रस स्वशब्द वाच्य होतात: भामह आणि दंडी ज्या पद्धतीने रसवत् अलंकाराचे वर्णन करतात ते पाहिले तर तेही रस स्वशब्द-वाच्य समजतात हे दिसून येईल. उदा० रत्नावली (२.१४) याठिकाणी रत्नावलीच्या सौंदर्याचे वर्णन करताना विस्मयाचा उल्लेख आलेला आहे. दंडीने तिथे कोणता अलंकार मानला असता ? हे उघडच आहे की दंडी-भामहांनी ह्या ठिकाणी अद्भुत हा रसवत् मानला असता. रसांच्या ह्या स्वशब्द-वाच्यतेप्रमाणेच रस स्थायींनी वाच्य होतात. हे महत्त्वाचे मत आहे. सामान्यत्वे आपण मी रसव्याप्त आहे, असे म्हणत नाही. मला भीती वाटते असे म्हणतो. हा प्रसंग जर उत्कट भीतीचा असेल तर उद्भट तेथे रस मानतो. जर हा प्रसंग सौम्य भीतीचा असेल तर त्या ठिकाणी उद्भट 'प्रेयस्वत्' हा अलंकार मानतो. व भावनांची जागृती अनुचित असेल तर तेथे तो 'ऊर्जस्वी' हा अलंकार मानतो. वाड्मयात अशा रीतीने भावबोध कधी स्थायीच्या उल्लेखाने, कधी संचारीन्या उल्लेखाने, कधी अनुभावांच्या उल्लेखाने सांगितलेला असतो. प्रसंगपरत्वे त्या सर्व ठिकाणी उद्भट रस मानतो. शिवाय विभाव हाच रस मानतो. विभावांना रस मानणे नाट्यशास्त्राइतके जुने आहे. नाट्यशास्त्रात विभाव म्हणजे रस ही भूमिका संग्रहीत आहे. अभिनव गुप्तांच्या समोर असणाऱ्या बारा भूमिकांच्यापैकी ही एक भूमिका आहे. अभिनवगुप्तांनी रससूत्रावरील उद्भटाचे विवेचनही उल्लेखिलेले नाही.
 राहुल, कीर्तिधर, मातृगुप्त, उद्भट यांचे रसविषयक विवेचन अभिनवगुप्त विचारात घेण्याच्या योग्यतेचे समजत नाही त्याला कारण आहे. कारण ही विवेचने रस-सूत्राची संगती लावून दाखवीत नाहीत. जे विवेचन रस सूत्राची संगती लावून दाखवीत नाही त्या विवेचनाला नाट्यशास्त्रातील फुटकळ श्लोकात जरी आधार असला तरी ती भरत संमत भूमिका नव्हे हे उघड आहे. रसत्रांची संगती लावून विवेचन करणारा अभिनवगुप्तांच्या समोरचा सर्वात जुना टीकाकार भट्ट लोल्लट आहे. नाट्यशास्त्राच्या जुन्या भाष्यकारांनी तपशिलाने विवेचन करण्याजोगे हे स्थळ आहे, असे मानलेले दिसत नाही. अभिनवगुप्त ज्यावेळी लोल्लटाच्या भूमिकेचा उपसंहार करताना, हा प्राचीनांचा पक्ष आहे. हा चिरंतन पक्ष आहे असे म्हणतो त्यावेळी तीन मुद्दे उपस्थित होतात. हे प्रायः रस-चर्चा करणारे अभ्यासक लक्षात घेत नाहीत.

१३