पान:रससूत्र (Rasasutra).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उदभट नाटयप्रतीती हा एक प्रकारचा भ्रम समजत होता. ज्या भावना नटांच्या ठिकाणी प्रेक्षकांना दिसतात, तो भ्रम आहे. असे त्याचे मत आहे. स्पष्टपणे आस्वाद प्रत्यय भ्रम आहे, असे म्हणणारा तो एकटाच दिसतो. नाटयाचा आस्वाद हे यथार्थ ज्ञान आहे, असे कुणीच म्हणू शकत नव्हता. रंगभूमीवर दिसतो तो ईश्वरावतार पूज्य राम नव्हे हे तर खरेच होते. मग ह्या प्रत्ययाला काय म्हणावे ? भारतीय तत्त्वज्ञानात आता फक्त दोन पर्याय शिल्लक राहतात. एक तर हा प्रत्यय भ्रम म्हणावा किंवा हा प्रत्यय अलौकिक समजावा. पैकी उदभटाने नाटय प्रतीती भ्रम, मानली आहे. नाटयशास्त्रात ह्या कल्पनेला आधार नाही. दुसरे म्हणजे उद्भट, नटाला रसास्वाद असतो हे मान्य करण्यास तयार नव्हता. नाटकातील व्यक्ती म्हणजे प्रकृती. ह्या प्रकृतीला शोक होतो. ही प्रकृती मरते. नट मरत नाही. तसा त्याला शोकही होत नाही. नट अभिनय करतो. प्रेक्षकांचा प्रत्यय भ्रम आहे. कारण नटांचा अभिनय हे सत्य नव्हे तो फक्त भास आहे. मग नटाला रसास्वाद कसा असणार ? काहीजण असे गृहीतच धरून चाललेले आहेत की सगळे लौकिकवादी नटाला रसास्वाद मानतात. उद्भट लौकिकवादी आहे. पण तो नटाला आस्वाद मानत नाही. उद्भटाच्या भामहावरील टीकेच्या आधारे अजून एक बाब कळते.
 तो रससामग्री पाच प्रकारची मानतो. स्वशब्द, स्थायी, संचारी विभाव व अनुमान ही ती पंचविध सामग्री आहे. स्थायीची सामग्री चार प्रकारची मानतो म्हणजे स्थायी संचारीनी उत्पन्न होत नाही, असे मानतो. ह्यापैकी उद्भटाने रस स्वशब्द- वाच्य मानला म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केलेली आहे. "स्वप्नात सुद्धा रस स्वशब्दवाच्य होऊ शकणार नाही" हा आनंदवर्धनापासून पुढच्या काव्यशास्त्रातला कायम मुद्दा आहे. तो अनेकानी अनेकवेळा मांडला आहे. स्थायी स्वशब्द वाच्य मानण्यावर मात्र कुणी फार जोराने आक्षेप घेत नाही. खरे म्हणजे कोणताही भाव जर स्वशब्द वाच्य असेल तर रस स्वशब्द वाच्य मानणे भाग आहे. उदभटावर झालेली ही सारी टीका अनाठायी मानणे भाग आहे. कारण ज्या बाबीला आनंदवर्धनोत्तर विवेचक रस म्हणत आहेत, ती बाब उद्भटासाठी रस नाही. ज्या बाबीला उद्भट रस मानतो ती बाब स्वशब्द वाच्य आहे. रस ह्या कल्पनेचे हे अगदी भिन्न असे दोन अर्थ आहेत. काव्याच्या नाटकाच्या आस्वादामुळे रसिकांच्या ठिकाणी जो भावगर्भ प्रत्यय उदभूत होतो त्याला रस म्हटले तर हा रस स्वशब्दवाच्य कधी असू शकणार नाही. कारण शब्दांचा वाच्यार्थ अर्थबोध करून देणारा असला तरी भाव जागृती करणारा असू शकत नाही. उद्भटांच्या टीकाकारांना हे अभिप्रत आहे म्हणून उद्भटावर ते कठोर टीका करतात. पण उदभट रस शब्द ह्या अर्थाने समजत नाही. तो प्रकृतीच्या भावनांना रस समजतो. त्याने रस चेतन्य भेदात आस्वाद्य असता, असा उल्लेख केला आहे. रस जर प्रेक्षकगत मानला तर आस्वाद आणि रस एक-

१२