पान:रससूत्र (Rasasutra).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असावा. या ग्रंथाचा एक अर्थ वंदनीय व उचित आहे असे शतकानुशतके वाटावे आणि आज पाहताना असे दिसते की तो त्या ग्रंथाचा अर्थच नव्हता. हे कसे घडले ? लक्षावधी माणसे शतकानुशतके एक बाब मान्य करीत आली. ही मान्यता विनाकारण नसते. ह्या मान्यतेला आधार ग्रंथात नसला तर इतरत्र कुठेतरी असतो. म्हणून अभिनवगुंंप्त बारकाईने तपासणेच भाग आहे. एरव्ही तो नाट्यशास्त्राचा अपुरा अभ्यास आहे.
 पण अभिनवगुप्त स्वतःच गुंतागुंतीचा आचार्य आहे. स्वतंत्र आणि विलक्षण प्रज्ञा हिचे जसे तो आदर्श उदाहरण आहे, त्याप्रमाणेच परंपरानिष्ठ समन्वयवादाचाही तो विलक्षण नमुना आहे. भरत आणि अभिनवगुप्ताचा विचार करायचा तर भरताचे नाव घेऊन वावरणारी सारी परंपराच चर्चेचा विषय करणे भाग आहे. त्यामुळे जर गुंतागुंत व पुनरुक्ती वाढणार असेल तर ती पत्करणेही भाग आहे. सरळ व क्रमाने विचार करताना जे गुंतागुंतीचे वाटते, त्याचा आपणच वाकडातिकडा विचार करावा हेच कदाचित गुंतागुंत कमी करणारे ठरेल असे मला वाटू लागलेले आहे.
 अभिनवगुप्तांनी सगळ्या रसचर्चेचे केंद्र एक वाक्य करून टाकले आहे. हे वाक्य म्हणजे नाट्यशास्त्रातील प्रसिद्ध रससूत्र होय. ह्या रससूत्राला हात घालण्यापूर्वी अतिशय स्थूलपणे हा विचार मी आपणासमोर ठेवतो. महाविद्यालयीन विद्दयार्थ्यांना हा विषय शिकवताना आरंभी ढोबळ कल्पना देण्याची प्रथा आहे. रसव्यवस्थेची ढोबळ कल्पना आम्ही अशी देतो. नाटक, कादंबरी वाचताना असे दिसते की वाचक, प्रेक्षक सतत निरनिराळ्या भावनांचा आस्वाद घेत असतो. मधेच त्याला हसू येते.: नायकाचे पराक्रम पाहून तो आनंदित होतो. खलनायकावर तो चिडतो. अशा प्रकारे ललित वाङ्मय वाचताना उत्कटपणे ज्या भावनांचा आपण आस्वाद घेतो तो रस आहे. हा रस आपणात कसा जाणवतो ? व्यक्ती, वातावरण, व्यक्तींचे हावभाव, त्यांचे बोलणे ह्यामुळे हा रस जाणवत असतो. आपण दुष्यंत आणि शकुंतला यांचा प्रेमप्रसंग घेऊ. हा प्रसंग पाहताना श्रृंगार जाणवतो. ह्या प्रसंगाचे विश्लेषण केले तर काय दिसते ? प्रथम म्हणजे दोन व्यक्ती-शकुंतला आणि दुष्यंत आहेत. दुष्यंताला शकुंतलेविषयी प्रेम वाटते; शकुंतलेला दुष्यंताविषयी प्रेम वाटते. हे त्यांचे प्रेम एकमेकांवर अवलंबून आहे. त्याला 'आलंबन विभाव' म्हणतात. दुष्यंतासाठी शकुंतला आणि शकुंतलेसाठी दुष्यंत अवलंबन विभाव आहेत. शिवाय प्रेम जाणवणारे दुष्यंत व शकुंतला हे प्रेमाचे आश्रयही आहेत. ह्या प्रेमासाठी एकांत, उद्दयान, चांदणे असे योग्य वातावरण हवे. त्याला ' उद्दीपन विभाव' म्हणतात. आलंबन, आश्रय, व उद्दीपन हे तीन विभाव आहेत; याचा 'विभाव' या एका शब्दानेच उल्लेख होतो. ह्या ठिकाणी असणारी प्रमुख भावना परस्परांच्याविषयीची रती आहे. ह्या प्रमुख भावनेला 'रती' म्हणतात. लज्जा, संकोच, अधीरपणा, आनंद अशा छोट्या छोट्या भावनांच्या योगाने रती