पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उदयाला येतात. असे वाटण्याऐवजी समस्येसाठी कथानक कथानकातून व्यक्तिरेखा आणि हे सगळे रंजक वाटावे यासाठी कल्पकता व भाषा असे गणित त्यांच्या मनात होते. म्हणून समस्या व कथानक घेताना ही माणसे नीतिप्रधान आहेत. आपण उपदेश करतो आहो असे त्यांना वाटते. हा उपदेश रंजक करण्यासाठी ही माणसे प्रयत्न करतात व रंजन करण्यातील यशावर आपले कलात्मक यश मोजतात. हा सगळा शर्करावगुंठित, पण औषध देण्याचा प्रकार आहे. कांतासंमित पण उपदेशाचा प्रकार आहे असे करंदीकरांचे म्हणणे होते. मला हे म्हणणे एकाएकी पटले नाही तरी चिंतनीय वाटले.
 करंदीकर आता या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहेत. शिल्लक आहे ते त्यांचे लिखाण, जे लिखाण शिल्लक आहे ते त्यांनी केलेल्या चिंतनाचा फक्त अंशमात्र आहे आणि तरीही शिल्लक आहे तेही खूप विचारप्रवर्तक व लक्षणीय आहे हेही खरे आहे.

(श्रीपाद कृष्ण कोल्हटकर.ले.मो.र.करंदीकर)

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर :साहित्य आणि संप्रदाय / ४५