पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनातही बावळटपणे वावरत असते व तेच तिचे सामर्थ्य असते.

परंपरावादी मन
  परंपरागत समाजरचना बदलण्याचे ध्येय जर खरोखरी कोल्हटकरांना आकलन झाले असते तर कदाचित त्यांच्या विनोदाचा नुसता आशय बदलला नसता, सगळी अभिव्यक्तीच बदलली असती. करंदीकरांनी यवतमाळ संमेलनाच्या प्रसंगी माझ्यासमोर मांडलेला, पण या ग्रंथात न आलेला एक मुद्दा मांडून मी थांबणार आहे. सामान्यपणे कोल्हटकर हे कलावादी मानले जातात. त्यांचे प्रमुख शिष्य कलावादी नसून जीवनवादी आहेत. मामा वरेरकर तर आग्रही जीवनवादी आहेत. ते स्वतःला अनेकदा नुसते जीवनवादी म्हणवून न घेता प्रचारक व प्रचारवादीही म्हणवून घेतात. खांडेकर जीवनवादी समीक्षक म्हणूनच प्रसिद्ध आहेत. भाऊसाहेब माडखोलकरांनी स्वतःला आल्हादपंथीय मानले तरी त्यांना कुणी कलावादी समजत नाही. या विसंगतीचे कारण काय? एका बाजूने पाहावे तो प्रो. फडके यांच्या कलावादी भूमिकेतील (खरे म्हणजे तंत्रवादी भूमिकेतील) सर्व मुद्दे कोल्हटकरांनी आधीच मांडलेले दिसतात. दुसऱ्या बाजूने पाहावे तो कोल्हटकर जीवनवादी समीक्षेतील प्रमुख बाबी आग्रहाने मांडताना दिसतात. हे दोन संप्रदाय परस्परविरोधी आहेत हे कोल्हटकरांना उमगलेले नव्हते काय?
  करंदीकरांचे मत असे होते की, कोल्हटकरांचे मन परंपरावादी आहे. परंपरावादी मनात अनेक विसंवादी व विसंगत बाबी सुसंगत म्हणून वावरत असतात व त्यांच्या परंपरावादी मनाला यात काही विसंगती आहे असे जाणवतसुद्धा नाही. नीतिमान, चारित्र्यमान जीवनाचा आग्रह व गणिकामैत्री ह्यातील विसंवाद जुन्या जगाला उमजतही नसे आणि त्यांच्या नीतिकल्पनात हा विसंवाद, विसंवाद म्हणून येतही नसे. विषम समाजरचना आणि त्यासह असणारे कोट्यवधीचे दारिद्र्य याचा समाजाच्या अंधश्रद्धेशी संबंध आहे असे त्यांना वाटत नसे. समाजसुधारणेचा आग्रह धरणागांना हे सगळे स्मृतिमान्य आहे असे सांगण्याची प्रबल हौस होती. त्यात काही चुकले असेही वाटत नसे. त्यांच्यासमोर जीवन नसेच. जीवन ही एक मिथ्या बाब होती. त्यांच्यासमोर प्रश्न होते. प्रश्नांसाठी कथानके असत. कथानक - स्वभावरेखेतून, स्वभावरेखा- जीवनातून

४४ / रंगविमर्श