पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिखाणात. करंदीकर सांगतात, ललित वाङ्मयाच्या विविध प्रकारांत त्यांच्या व्यासंगाला वाव नव्हता. विनोदी निबंधात त्यांच्या व्यासंगाला मोकळे रान होते. समीक्षेत त्यांच्या कल्पकतेला वाव नव्हता, विनोदात तो होता म्हणून त्यांचा विनोद यशस्वी झालेला आहे. करंदीकरांच्या विधानाला मी अजून एक जोड देऊ इच्छितो. कोल्हटकरांना भावनेचे फारसे आकर्षण नव्हते. त्यांना उत्कट प्रसंग जमतच नव्हते. विनोदात या भावनात्मक पातळीची गरज नव्हती हेही तेथील यशाचे एक कारण म्हटले पाहिजे.

चेष्टेखोराची कल्पकता
  कोल्हटकर हे कल्पक खरे, पण ती कल्पकता संविधानक रचनेची नव्हती, निसर्गातील सौंदर्य प्रतिमाबद्ध करणाऱ्या कवीची नव्हती, भावगर्भतेला अधिक गाढ करणाऱ्या रससिद्धाची नव्हती. विसंवाद-औचित्यभंग-अपेक्षाभंग यासाठी साम्य-वैषम्य शोधणाऱ्या चेष्टेखोराची ती कल्पकता होती. तिला विनोदातच मोकळा वाव होता.
  करंदीकरांनी कोल्हटकरांच्या महाराष्ट्रगीताची व वंदेमातरम या राष्ट्रगीताची केलेली तुलनाही अशीच मार्मिक आहे. या पुरोगामी पंडिताला महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या आकांक्षा समरसून कधी आकलनच करता आलेल्या नाहीत, असा टोला या गीतावर ते हाणतात. महाराष्ट्रगीतात ज्ञानेश्वरच विसरून राहिला हेही ते सांगतात.
 कोल्हटकरांच्या वाङ्मयातील उणिवा दाखविणे सोपे आहे. या उणिवांची संगती लावून देणे, त्यांचा उलगडा करून दाखविणे अतिशय कठीण आहे. त्यांच्या इतर वाङ्मयाप्रमाणेच समीक्षेला व विनोदालाही हाच नियम लागू होतो. अगदी विनोदी लिखाण घेतले तरी त्यात पांडूतात्या, बंडूनाना व सुदामा या त्रयीला मूर्ख, हास्यास्पद ठरविणेही त्यांना अपेक्षित असते व या मर्ख, हास्यास्पद मंडळींना जिज्ञासू, चौकस व माहितगार ठरविणेही त्यांना भाग असते. जर ही माणसे चौकस जिज्ञास नसतील तर मग विविध माहितीचा बारकावा देता येत नाही आणि मूर्ख नसतील तर हास्यास्पद करता येत नाही. मूर्त्यांना हास्यास्पद करून आपण हिंदू धर्मातील अंधश्रद्धा हास्यास्पद करू शकतो काय, हाही एक प्रश्नच आहे. कारण अंधश्रद्धा जाणत्या-शहाण्या-विचारी माणसांच्या

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : साहित्य आणि संप्रदाय / ४३