पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता व शेवटी निर्णय दिला होता की कोल्हटकरांचा मराठी वाङ्मयावरील प्रभाव प्रायः नावीन्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बहिरंग घटकांचा होता. ह्या प्रभावामुळे वाङ्मयीन जाणिवांचा फारसा भाग मुद्रित प्रबंधात आलेला नाही.
  करंदीकरांच्या मुद्रित प्रबंधाचे स्वरूप फार स्थूल झालेले दिसते. त्यांची विचार करण्याची पद्धती, विश्लेषण व वर्गीकरण अशी कोल्हटकरांच्या जातकुळीचीच होती. छोट्या छोट्या बाबींना पुरावे देत ते जात. या आपल्या अभ्यासाचे संक्षिप्त रूप सादर करताना आपण किती स्थूल होतो आहो याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही. मनाचा विकलपणा म्हणायचा तो यालाच; पण याही अवस्थेत अतिशय मार्मिक अशी विधाने या प्रबंधात जागोजागी विखुरलेली दिसतात ती नीट पाहून घेणे वाङ्मयाभ्यासकांना उपयोगी ठरेल.

कल्पना व विनोद हे घटक प्रारंभी प्रमुख
  कोल्हटकरांचे एक विधान असे आहे, 'माझ्या संप्रदायाचे विशेष आरंभी कल्पना व विनोद होते.' हे विधान कोल्हटकरांनी आपल्या उतारवयात व प्रौढपणी केलेले आहे. समीक्षक म्हणून आपला काही मराठीवर प्रभाव आहे असे कोल्हटकर मानीत नव्हते की काय? मराठी नाटकांच्या क्षेत्रात त्यांना युगप्रवर्तक मानले जाते. ते कोल्हटकरांना मान्य नव्हते की काय? कल्पनाविलास व शाब्दिक कोट्या यांनी जखडून गेलेली भाषाशैली यापेक्षा मराठी नाटकांना आपली काही निराळी देणगी आहे असे त्यांना वाटत नव्हते की काय? आपल्या संप्रदायाचे विशेष आरंभी अमूक होते नंतर तमूक होते हे सांगून आपलाच संप्रदाय बदलत गेला असे त्यांना म्हणावयाचे आहे की काय? असे अनेक प्रश्न या विधानामुळे निर्माण होतात.

गडकऱ्यांबद्दलचे मत
 गडकरी हे उत्कट भावनाविलासाचे लेखक आहेत. ही भावनेची उत्कटता त्यांना इतकी आवडली आहे की त्यामागे लागताना ते पुष्कळदा अतिरेकी, भडक व नाटकी पण समूहमनाच्या दृष्टीने अतिशय प्रभावी व परिणामकारक लिखाण करतात. त्यांची कल्पकता या भावप्रदर्शनाची सहकारिणी असते. गडकरी स्वतःला कोल्हटकरांचे शिष्य समजत व ते कोल्हटकर संप्रदायाचे एक नेतेही

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : साहित्य आणि संप्रदाय / ३९