Jump to content

पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोल्हटकर संप्रदाय
 आहे या अवस्थेतही या निबंधात विचाराला खूप मोठे खाद्य आहे. करंदीकरांची सारीच मते सर्वांना पटतील अशी नाहीत; पण ती अंतर्मुख होण्यास व फेरविचार करण्यास भाग पाडणारी निश्चित आहेत. खरोखरच मराठीत कोल्हटकरांचा संप्रदाय आहे काय? या प्रश्नाची करंदीकरांनी केलेली मांडणी सर्वांना पटेलच असे नाही; पण करंदीकरांचे खंडण करीत बसण्याऐवजी जर कुणी कोल्हटकर संप्रदायाचे विशेष निश्चित करू लागला तर तो अभ्यासक अडचणीत येईल. कारण ते विशेष कोल्हटकर संप्रदायाच्या पाईक लेखकात दाखविता येणार नाहीत. वडील भाऊसाहेब माडखोलकर हे कोल्हटकर संप्रदायाचे एक अग्रगण्य लेखक. त्यांच्या वैचारिक निष्ठा कोल्हटकरांपेक्षा किती तरी निराळ्या, शैली निराळी, ललित वाङ्मयाचे स्वरूप निराळे. आपण जे जग पाहतो, जे अनुभवतो ते लिहितो असा माडखोलकरांचा दावा. मजजवळ फारशी कल्पकता नाही असे त्यांचे म्हणणे. कल्पकता हे कोल्हटकरी संप्रदायाचे प्रमुख लक्षण. माडखोलकरांच्या लिखाणात विनोद किती आहे हेही तपासूनच पाहावे लागेल. एकेका सांप्रदायिकाचे दावेही मोठे विलक्षण आहेत. वरेरकर सांगतात, 'कोल्हटकरांनी कुणाचेही अनुकरण केलेले नाही. हेच अनुकरण मी केले' हयात मी कोल्हटकरांचे अनुकरण केलेले नाही, इतका भाग तर सत्य आहे. फार तर आपण करंदीकरांची मांडणी नापसंत करू व मनपसंत मांडणी सांगू. निष्कर्ष पुन्हा हाच येणार की कोल्हटकर संप्रदाय पुराव्याने सिद्ध करता येत नाही.
 कोल्हटकरांचा प्रभाव सांगता येतो असे करंदीकर म्हणतात. त्यांनी त्याही प्रश्नाचा खूप सविस्तर विचार केलेला होता. करंदीकर असे मानतात की ललित वाङ्मयात साहित्यिकांच्या परस्परांवरील प्रभावाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. कोणत्याही भाषेतील मोठ्या लेखकांचे प्रभाव वाङ्मयजगावर पडतातच, तो एक प्रश्न आहे. एखाद्या कालखंडात लोकप्रिय ठरलेल्या घटकांचे अनुकरण होते तो एक वेगळा प्रश्न आहे आणि प्रतिष्ठित ठरलेल्या घटकांचा परिणाम व अनुकरण होते हा पुन्हा तिसरा प्रश्न आहे. त्या प्रभावामधून कधी कलात्मक जाणिवा अधिक डोळस होतात व वाङ्मयाची अंतरंगसमृद्धी वाढते. कधी केवळ बहिरंगाचे नावीन्य वाढते. करंदीकरांनी असा हा प्रश्नांचा चौरस विचार केलेला

३८/ रंगविमर्श