पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझा त्या माणसाविषयीचा आदर वाढतही नाही आणि कमीही होत नाही. त्यामुळे प्रबंध नाकारला गेला याविषयी थोडासा विषाद वाटला, पण यापेक्षा अधिक काही वाटले नाही. करंदीकरांना मात्र खोलवर हे शल्य जाणवत होते. त्यांची माझी शेवटची भेट यवतमाळ संमेलनात झाली. त्याही वेळी आम्ही खूप बोललो. मला त्यांच्याविषयी आकर्षण होते.
 या दुर्दैवी इतिहासाचा उत्तरार्ध त्याहून विषादजनक आहे. माझे म्हणणे असे होते की, पदवी पाहिजे कशाला? अभ्यासाचा आनंद तुम्ही भोगला आहे. तुम्ही तुमचे निष्कर्ष लोकांसमोर ठेवा. पदवीची काय पत्रास. करंदीकरांनी तो प्रयत्न केला. हा प्रबंध प्रकाशित होत असताना ते वारले आणि मी जेव्हा हा प्रबंध पाहू लागलो त्या वेळी मला जाणवले ते हे की करंदीकरांनी केलेला आपला प्रचंड व्यासंग, त्यांनी विचारात घेतलेले अनेक प्रश्न प्रबंधात आलेच नाहीत. त्यांच्या चिंतनाचा फारच थोडा भाग इथे छापलेला आहे. त्यांनी स्वतःच मुद्रणाच्या शक्यता विचारात घेऊन एका पृष्ठ मर्यादेत बसायचे ठरविलेले दिसते.

गाळलेले भाग
 आम्ही चर्चिलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा सांगतो. श्रीपाद कृष्णांच्या टीकाविचारांचा त्यांनी फार सूक्ष्म तपशिलाने विचार केलेला होता. कोल्हटकरांच्या मनात कलेच्या सौंदर्याविषयी नेमके कोणते रूप होते याची त्यांच्याच विधानांच्या आधारे करंदीकरांनी तपशिलाने पाहणी केलेली होती व ' कोल्हटकर कलात्मक व्यवहारातील कल्पनेचा भाग भावनात्मक परिणामाच्या भागापेक्षा स्वतंत्र व त्या भागाला निरपेक्ष असा घटक समजत, असे मत त्यांनी दिलेले होते. याचा अर्थ असा की कोल्हटकरांच्या समीक्षा भूमिकेत 'क्ष' ही कलाकृती नावीन्य, कल्पकता या दृष्टीने अगदीच सामान्य आहे, भावगर्भतेच्या व उत्कट परिणामाच्या दृष्टीने सामान्य आहे; पण ही कलाकृती अतिशय सुंदर आहे, हे विधान सुसंगत ठरू पाहात होते. आज समोर असणाऱ्या प्रबंधात ही चर्चा दिसत नाही. असे अनेक मुद्द्यांविषयी म्हणता येईल. मनाच्या व शरीराच्या विकल अवस्थेत हा ग्रंथ- ही मुद्रित प्रत– सिद्ध झालेली दिसते. असो. जे झाले त्याला इलाज नाही.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : साहित्य आणि संप्रदाय / ३७