पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण २ रे



श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : साहित्य आणि संप्रदाय



 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी वाङ्मयातील एक कायम लक्षणीय व आदरणीय असे व्यक्तिमत्त्व आहे. ज्या समीक्षकांनी कोल्हटकरांच्या वाङ्मयाला असणाऱ्या विविध मर्यादा व या वाङ्मयाच्या उणिवा तपशिलाने दाखविल्या त्यांच्याही मनातील कोल्हटकरांविषयीचा आदर कधी उणावला आहे असे दिसत नाही. मराठी वाङ्मयात कोल्हटकरांचे असे विशेष स्थान आहे, त्यामुळे दोषदर्शनार्थ असो की गुणवर्णनार्थ असो, त्यांचा सतत विचार करावाच लागतो. त्यांची उपेक्षा करता येत नाही. कै. मोरेश्वर रत्नाकर करंदीकर यांचा कोल्हटकरांवरील नवीन प्रबंध ही कोल्हटकरविषयक चर्चेत पडलेली एक महत्त्वाची स्वागतार्ह भर म्हटली पाहिजे.

करंदीकरांचा प्रबंध
  त्या ग्रंथाचा इतिहास थोडा दुर्दैवी आहे. कै. मो. र. करंदीकर हे माझे फार निकटचे मित्र होते असे मी म्हणणार नाही; पण त्यांचा माझा परिचय बराच होता व जिव्हाळ्याचा होता. इ. स. १९५५ साली डॉक्टरेटसाठी त्यांनी हा विषय निवडला. औरंगाबाद साहित्य संमेलनात इ. स. १९५७ सालच्या आरंभी माझी व करंदीकरांची पहिली भेट झाली तेव्हा कोल्हटकरांच्या विषयीच आम्ही खूप बोललो. ज्या पद्धतीने ते चर्चा करीत होते, त्यावरून त्यांना पुष्कळसे नवीन सांगायचे आहे हे जाणवत होते. त्यानंतर त्यांच्या मधून मधून भेटी होत गेल्या. करंदीकरांची परिश्रमाची शक्ती फार अफाट होती; पण काय झाले सांगता येत नाही. त्यांना डॉक्टरेट मात्र मिळू शकली नाही. त्यांचा प्रबंध नाकारला गेला. मला स्वतःला पदव्यांविषयी फारसे आकर्षण नाही. पदवी एखाद्याला मिळाली म्हणून

३६ / रंगविमर्श