पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवेश नाटकामध्ये असणे हे नाटककाराचे अपयश मानले पाहिजे. कथेसाठी आवश्यक असणाऱ्या या शुद्ध निवेदनाच्या नाट्यशन्य घटना नाटककाराला संवादाच्या ओघात सुचवता आल्या पाहिजेत. किर्लोस्करांपासून अशा प्रकारचे निवेदनपर प्रवेश सर्व नाटककारांनी वापरलेले आहेत. असे प्रवेश खाडिलकरांमध्ये कमी आहेत. गडकऱ्यांच्या नाटकात, विशेषतः 'प्रेमसंन्यास' आणि 'पुण्यप्रभावा'त अशा प्रवेशांची संख्या अधिक आहे. कोल्हटकरांची नाटकेच नाट्यशून्य असल्यामुळे अशा प्रवेशांची त्यांच्या नाटकांत मोजदाद करता येणे कठीण आहे. देवलांच्या 'शारदा' नाटकातही अशा नाट्यशून्य कथनपर प्रवेशाचा अगदीच अभाव नाही. दुसऱ्या अंकाचा पहिला व चौथा प्रवेश, तिसऱ्या अंकाचा चौथा प्रवेश, चौथ्या अंकाचा पहिला, चौथा व पाचवा प्रवेश, पाचव्या अंकाचा तिसरा व चौथा प्रवेश अशा एकूण एकवीस प्रवेशांपैकी 'शारदे 'तील आठ प्रवेश उघडच नाट्यशून्य आहेत. काही प्रवेश खूप मोठे असणे, काही अगदीच लहान असणे हाही प्रकार देवलांच्या नाटकात आहेच. देवलांच्या समकालीन रंगभूमीचे हे सार्वत्रिक दोष होते. ते देवलांच्यामध्येही आहेत इतकाच याचा अर्थ.
 'शारदा' नाटकाचा पहिला अंक प्रदीर्घ असा एक प्रवेशी अंक आहे. या एक प्रवेशी अंकातच कांचनभट वजा जाता नाटकातील सर्व प्रमुख पात्रांशी आपला परिचय होतो. मध्यवर्ती संघर्षाला आरंभही होतो. या प्रवेशामुळे काही समीक्षकांना इब्सेनच्या नाट्यरचनेची आठवण होते. देवल हे समस्याप्रधान नाटककार मानले गेल्यामुळे त्यांचा विचार करताना मधूनमधून इब्सेनची आठवण होणे स्वाभाविक आहे, पण या अंकातील सर्व रचना बारकाईने पाहिली तर हा अंक एकप्रवेशी अंक असला तरी त्याचे स्वरूप इब्सेनच्या अंकासारखे नसून संस्कृत नाटकातील अंकासारखे आहे असे दिसू लागते. या अंकाची विभागणी अनेक प्रवेशांत करायची राहून गेलेली आहे, इतकेच काय ते म्हणता येईल.

पदांचा उपयोग
  देवलांच्या काळी नाटकातून पदांचे प्रमाण फार मोठे असे. या नाटककारांच्या समोर संस्कृत नाटकातील पद्यविभाग असे. ही संस्कृत

३४/ रंगविमर्श