पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संविधानक-रचना म्हणताना मला फक्त सुसंगत कथानक अभिप्रेत नाही, तर कथानकाच्या सुसंगतीपेक्षा नाट्याच्या उठावाच्या संदर्भात या कथानकाची मांडणी मला विशेष महत्त्वाची वाटते. कथानकाच्या मांडणीच्या दृष्टीने नेहमी देवल आणि खाडिलकर यांचा उल्लेख केला जातो. 'शारदा' नाटकाचा पुरावा असलाच तर या संविधानक-कौशल्याच्या विरोधी आहे. गडकरी निदान - आपल्या नाटकाचा पहिला आणि शेवटचा अंक अतिशय प्रभावी ठेवतात; ही गोष्ट खाडिलकरांना ज्याप्रमाणे जमली नाही, त्याप्रमाणे देवलांनाही 'शारदे'त जमू शकली नाही. क्रमाने 'शारदा' नाटक तिसऱ्या अंकाच्या तिसऱ्या प्रवेशापर्यंत सारखे रंगत जाते. इथून क्रमाने नाटकाची रचना शिथिल होत गेली आहे. चौथ्या अंकापासून तर हे नाटक कोसळतच जाते. अलीकडे या नाटकाचा प्रयोग करताना पुष्कळदा तिसऱ्या अंकाचा चौथा प्रवेश टाळला जातो किंवा 'जो लोककल्याण साधावया जाण' हे पद घेऊन घाईघाईने उरकला जातो. चौथ्या अंकाचा पहिला प्रवेश, तिसरा, चौथा व पाचवा प्रवेश बहुशः गाळले जातात. पाचव्या अंकातील तिसरा आणि चौथा प्रवेश पुष्कळ संक्षिप्त केला जातो. पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशापासून शेवटच्या अंकाच्या शेवटच्या प्रवेशापर्यंत नाट्यप्रयोग क्रमाने रंगत जात नाही. देवलांच्या पिढीतील सगळ्याच नाटककारांच्या नाट्यरचनेत हा दोष आहे; परंतु प्रयोगाच्या सोयीखातर जेव्हा संक्षेप केला जातो, त्या वेळी मधले भाग गाळले जाणे हा एक स्वतंत्र भाग आहे. ज्या काळी नाटक सात-आठ तास चालत असे, त्या काळातील लिखाण जर चार-पाच तासांत बसवायचे असेल तर व्यवहारतः संक्षेप करणे भागच असते; पण या संक्षेपात जर नाटकाचे शेवट गाळल्या जाण्याच्या स्वरूपात दिसू लागले, तर नाटक संपण्यापूर्वी कुठेतरी आधीच नाट्य संपून जाते असे म्हणण्याची पाळी येते. ज्या काळात देवल नाटक लिहीत होते, त्या काळी आवश्यक असणाऱ्या अनेक घटना आज अनावश्यक ठरलेल्या आहेत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने कोदंडाने शारदेचे पाणिग्रहण केले की नाटक संपून जाते. कथानक सुसंगत असणे-नसणे यापेक्षा कथानकातील नाट्याचे आरंभ-शेवट नीट पकडता येणे महत्त्वाचे असते. खाडिलकरांच्या नाटकाच्या शेवटच्या भागाप्रमाणे देवलांच्याही नाटकाचे शेवटचे भाग कोसळत जातात.
  प्रयोगक्षमतेच्या दृष्टीने केवळ कथानकातील दुवे जोडणारे निवेदनवजा

रं....३
देवलांची शारदा / ३३