पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करता आली तर मग ती अधिक लोकप्रिय होतात. शतकानुशतके जगातल्या सर्व लेखकांनी नाद करणारी सांकेतिक पात्रे अत्यंत लोकप्रिय करून दाखविलेली आहेत. 'शारदे'त हेही सगळे आहे.

प्रत्ययकारी संवादरचना
  अतिशय प्रत्ययकारी आणि जिवंत अशी देवलांच्या संवादांची रचना आहे. सुप्त प्रेमकथा आहे. सर्व चित्रणात परंपरागत श्रद्धांची जपणूक आहे. त्याखेरीज त्यांनी सद्गुणांच्या विरुद्ध दुर्गुण सतत उभे ठेवलेले आहेत, पण याखेरीज 'शारदे'त अजून काही बाबी आहेत. व्यक्तिदर्शनाचे देवलांचे सामर्थ्य काहीही म्हटले तरी आपल्या समकालीन नाटककारांच्यापेक्षा वरचढ आणि सूक्ष्म आहे. नाट्याच्या आस्वादासाठी एक वास्तवाचा भास आवश्यक असतो. समोरचा नट अर्जुन आहे, सुभद्रा आहे हे तर मान्य करावेच लागते, पण समोरची कल्पित कथा खरीखुरी आहे हेही मान्य करावेच लागते. पौराणिक-ऐतिहासिक किंवा काल्पनिक नाटक पाहताना म्हणजे 'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान' पाहताना आपण कितीही समरस झालो तरी हे नाटक आहे, वास्तव नव्हे, हे भान आपण विसरू शकत नाही. 'शारदे ने इतर परिणामकारक नाटकांच्यामध्ये असणारा जो वास्तवाभास होता, तो आत्मसात करण्यात तर यश मिळवलेच आहे, पण हे जीवनाचे चित्र आहे असा भास निर्माण करण्यातही यश मिळवलेले आहे. आपण आपले जीवनच पाहतो आहो या समजुतीने 'शारदा' नाटक पाहणे प्रेक्षकांना शक्य होते.
  चांगल्या नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या या सगळ्या बाबी आत्मसात करून देवलांनी (कथानक व घटनांची कृत्रिमता बाजूला सारल्यास) विशेषतः शारदा आणि इंदिराबाई यांच्या व्यक्तिरेखांत नाटकातील वास्तववादाचा असामान्य विकास घडवून दाखवलेला आहे. किर्लोस्कर, कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी या चौकटीतच देवल बसतात, पण या चौकटीत मात्र ते सर्वांत जास्त वास्तवाभिमुख यशस्वी नाटक लिहिणारे ठरले आहेत. मागे किर्लोस्कर आणि बाजूला खाडिलकर एकीकडे आणि देवल दुसरीकडे असे उभे राहिले म्हणजे प्रथमदर्शनीच फार मोठे अंतर या दोन गटांत असल्याचा भास होतो. जसजसा आपण विचार करू लागतो, तसतसे या दोन गटांतले अंतर कमी

देवलांची शारदा /३१