Jump to content

पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजणे, वेष पालटणे, इशाऱ्याची पत्रे पाठवणे, नायकाने कैदेत पडणे, योग्य वेळी सुटणे, खलनायकास ऐनवेळी पोलिसांनी पकडणे, खलनायकाने विश्वासू म्हणून मानलेला सहकारी नायकाचा मित्र असणे, ऐन लग्नाच्या एक-दोन दिवस आधी गंगापुरातून लाचखोर अधिकारी बदलले जाऊन शुद्ध तुळशीपत्र असलेले अधिकारी तेथे येणे- हा मालमसाला भरपूर आहे. स्वप्ने केवळ शारदेलाच पडत नाहीत, ती भुजंगनाथालाही पडतात. शारदेच्या स्वप्नात कोदंड येऊन तिचे पाणिग्रहण करतो. भुजंगनाथाच्या स्वप्नात लग्नाची वरात निघताना राजदूत येऊन पकडतात व कोदंड हसतो असे येते. भद्रेश्वर दीक्षितांनाही स्वप्ने पडतातच; पण त्यांच्या स्वप्नात काय येते हे नाटकात सांगितलेले नाही. सगळ्या बाबी एकत्रितरीत्या विचारात घेतल्या, तर 'शारदे'त वास्तववादापेक्षा,सांकेतिकतेचे,कृत्रिमाचे, स्वप्नरंजनाचे रंग अधिक गडद आहेत असा निर्णय घेणे भाग पडते.
 ही सगळी चर्चा 'शारदा' नाटक चांगले नाटक आहे की नाही या संदर्भात विचारात घ्यायची नाही. 'शारदा' हे समस्याप्रधान वास्तववादी नाटक आहे की नाही इतक्या मुद्द्यापुरता हा विचार चालू आहे. 'शारदा' नाटकाची परिणामकारकता, त्याचे चांगलेपण हे वादातीत आहेच. एखादे नाटक चांगले असण्यासाठी ज्या प्रकारचा वास्तवाभास त्या नाटकात असावा लागतो, तो 'शारदेत आहे. फक्त सामाजिक वास्तववाद या ठिकाणी नाही इतकाच माया मुद्दा आहे. 'सौभद्र' सारखे नाटक अतिशय लोकप्रिय झाले. या लोकप्रियतेचे बहिरंगाचे घटक आपण पाहू लागलो तर संगीत, प्रेमकथा, सुखी शेवट, कपट-कारस्थान, अनुरूप वरप्राप्ती अशा बाबी आपल्या हाताशी लागतात. 'शारदे'त हे सगळे बहिरंगाचे घटक आहेत. 'सौभद्र' इतक्या लोकप्रिय न झालेल्या किंवा संपूर्णपणे अयशस्वी ठरलेल्या नाटकातही हे बहिरंगाचे घटक सापडू शकतात. अंतरंगाचे घटक म्हणून पाहिले तर 'सौभद्रा'त सांकेतिकच पण जिवंत व्यक्तिरेखा, त्या निर्माण करणारे संवाद, अतिशय स्थूल पण साम्य-विरोधावर असणारे नाट्य, या बाबी दिसू लागतात. कलात्मकता आणि लोकप्रियता यांतील फरक आपण जर मान्य करणार असू, तर सांकेतिक पात्रे अनुभवाला सोपे आणि साधे परिमाण देतात, ती अधिक परिणामकारक ठरतात असे आपणास आढळून येईल. नाट्याच्या परिणामकारकतेला स्थूल सांकेतिक पात्रे बाधा आणीत नाहीत. ही स्थूल सांकेतिक पात्रे जर पुरेशा प्रमाणात जिवंत

३० / रंगविमर्श